satyajeet tambe

नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik MLC Election) काँग्रेसकडून मविआच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याची भूमिका घेतली गेल्यामुळे काँग्रेस आमदार सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आक्रमक भूमिका घेतली. सत्यजीत तांबेंनी नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली.

    मुंबई: काँग्रेस (Congress) पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर सत्यजीत तांबेंच्या प्रतिक्रियेची सगळेजण वाट बघत होते. सत्यजीत तांबेंनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik MLC Election) अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून त्यांच्यावर निलंबनाची (Satyajit Tambe Suspended) कारवाई करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करणार असल्याचं सत्यजीत तांबेंनी सांगितलं आहे.

    नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून मविआच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याची भूमिका घेतली गेल्यामुळे काँग्रेस आमदार सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी आक्रमक भूमिका घेतली. सत्यजीत तांबेंनी नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली. त्यानंतर त्यांचं ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आलं. त्यावर त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

    काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा कधीच विचार केला नाही.  मी २२ वर्षं काँग्रेसमध्ये काम केलं आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. माझ्या श्वासात काँग्रेस आहे. आम्ही काँग्रेस सोडून कधी दुसरा विचार केला नाही. अनेक लोक अनेक पक्षांमध्ये गेले, आले आणि मोठे झाले. पण आम्ही कधी तशी भावना ठेवली नाही. आम्ही एकनिष्ठतेनं आम्ही पक्षाबरोबर राहण्याचं काम केलं असल्याचं तांबे म्हणाले.

    ते पुढे म्हणाले की,२०३० साली माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. माझ्या पणजोबा-आजोबांपासून आम्ही सतत चार चार पिढ्या काँग्रेसमध्ये काम करत आहोत.सत्तेची पदं आमच्यासाठी फार महत्त्वाची नाहीत. सत्ता आम्ही जन्मल्यापासून बघितली आहे. माझा जन्म ८३ सालचा आहे. त्यानंतर ८५ साली थोरात साहेब आमदार झाले. त्याआधी माझे आजोबा भाऊसाहेब थोरात हेही आमदार होते. त्यामुळे सत्ता हा फार महत्त्वाचा मुद्दा नाही. राजकारणात आपण काय काम करण्यासाठी आलो आहोत, ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे.

    निलंबित केल्याचं दु:ख आहेच. योग्य वेळी मी त्याला उत्तर देईन.अनेक शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बँकिंग कर्मचारी संघटना, अनेक लोक, पदाधिकारी मला पाठिंबा देत आहेत. योग्य वेळी त्यावर मी निर्णय घेईन. राजकारण चाललेलं आहे. सगळं राजकारण होऊ द्या, मग मी त्यावर बोलेन, असं त्यांनी सांगितलं.