
Pune University Vice Chancellor : अनेक दिवसांपासून लक्ष लागलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अखेर डॉ. सुरेश गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. यासह मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरूपदी डॉ. संजय भावे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी व डॉ. सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत 27 उमेदवार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) कुलगुरूपदाच्या मुलाखतीसाठी २७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात विद्यापीठातील विविध विभागांमध्ये व विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदांवर काम करत असलेल्या ११ उमेदवारांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केला होता. या उमेदवारांमध्ये कुलगुरूपदासाठी चुरस होती. त्यातील चार उमेदवारांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली आहे. तर एक उमेदवार विद्यापीठाबाहेरील होता.
या पाच उमेदवारांबाबत चर्चा रंगली
मुलाखतीनंतर विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर , विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागाचे डॉ.संजय ढोले, पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुरेश गोसावी आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांबाबत चर्चा होती.
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया वर्षभर लांबली
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया तब्बल वर्षभर लांबली होती. विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी १८ व १९ मे रोजी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातील पाच उमेदवारांची नावे अंतिम मुलाखतीसाठी निश्चित केली होती. त्यातील डॉ. गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. गोसावी यांनी प्रशासनाचाही अनुभव आहे.