सावकर मादनाईक देणार ‘जिल्हा नियोजन’चा राजीनामा

कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती नियुक्तीचे गेले दोन वर्ष राहिलेले भिजत घोंगडे गुरुवारी पार पडले. परंतु, या नियुक्तीनंतर आरोप-प्रत्यारोप  सुरू झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकनिष्ठ नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक यांची जिल्हा नियोजन सदस्य म्हणून निवड झाली आहे.

  जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती नियुक्तीचे गेले दोन वर्ष राहिलेले भिजत घोंगडे गुरुवारी पार पडले. परंतु, या नियुक्तीनंतर आरोप-प्रत्यारोप  सुरू झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकनिष्ठ नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक यांची जिल्हा नियोजन सदस्य म्हणून निवड झाली आहे. परंतु, आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने आम्हाला हे पद नको आहे, असे सांगत जिल्हा नियोजनचा राजीनामा देणार असल्याचे सावकर मादनाईक यांनी सांगितले.

  गेली दोन वर्ष एकत्रित राहिल्यानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही, असे आरोप करत स्वाभिमानीने ‘जय महाराष्ट्र’ केला होता. परंतु आता झालेल्या जिल्हा नियोजनाच्या नियुक्तीमध्ये आम्हाला कोणतेही पद नको, अशी भूमिका घेतली आहे.

  जिल्हा नियोजन सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते. परंतु, आमची कामे पूर्ण केले जात नाहीत. फक्त बैठकीसाठी आम्हाला मर्यादित ठेवले जाते, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तत्कालीन जिल्हा नियोजन सदस्य जालंदर पाटील यांनीही राजीनामा दिला होता. या भूमिकेमुळे महाविकास आघाडी विरोधातील संघर्ष तीव्र होणार हे मात्र नक्की आहे.

  ज्यावेळी जिल्हा नियोजन कार्यालयातून मला माहिती देण्याबद्दल संपर्क झाला होता. त्याचवेळी मला हे पण नको आहेत. असे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु, काल जरी नियुक्ती झाली असेल तरी मी याचा राजीनामा देणार आहे. महाविकास आघाडीकडून आमचा अपेक्षाभंग झाल्याने ही आघाडी शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. त्याचमुळे मी या पदाचा त्याग करत आहे.

  – सावकर मादनाईक, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

  गतवेळी जिल्हा नियोजनच्या सदस्य नियुक्तीवेळी माझी नेमणूक करण्यात आली होती. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगड या भागासहित जिल्ह्यातील इतर बऱ्याचशा वाड्या वस्त्यांना स्वातंत्र्यानंतरही एक रुपयाचा निधी लागला नसल्याचा प्रश्न चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना मी वारंवार आवाज उठवला होता. त्यावेळी सध्याचे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी माझे अभिनंदन केले होते. परंतु, आता ते स्वतः पालकमंत्री असताना देखील माझ्या या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिले नाही. या कारणास्तव मी त्यावेळी राजीनामा दिला होता.

  – जालंदर पाटील, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी.