
दहा समित्यांवर कुणाला घ्यावे, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात दोन दिवसांपूर्वी एक बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे गटनेते आणि विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कोणत्या समितीत कोणाची वर्णी लागावी यावर चर्चा झाली. त्यात सर्वानुमते पक्षाच्या संख्याबळानुसार समितीत प्रतिनिधित्व देण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती आहे.
भंडारा : जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीनंतर विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक घेतली गेली. त्यानंतर आता विषय समितीत सदस्य निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यात सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाला अधिक प्रतिनिधित्व मिळते तर, काही पक्षांना समितीत स्थानही मिळत नाही. परंतु, भंडारा जिल्हापरिषदेत (Bhandara Zilla Parishad) या दहाही समित्यांसाठी सर्व पक्षांचे एकमत होऊन निवडणूक टाळण्यासाठी सत्ताधारी विरोधकात हातमिळवणी झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीत १० मे ला भंडारा जिल्हापरिषदेत तर, चक्क सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी होत मारामारी झाली. नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले व जिल्हा परिषद उपाध्यक्षासह एक सदस्य आणि पंचायत समिती सभापतीविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. हे प्रकरण ताजे असतानाच आता सत्ताधारी आणि विरोधकात दहा समित्यांवर वर्णी लागावी म्हणून हातमिळवणी झाल्याचे आणि दहा समित्या वाटून घेण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आपण सगळे भाऊ भाऊ मिळून मिसळून सत्तेत राहू’ या तत्त्वानुसार भंडारा जिल्हापरिषदेत सत्ताधारी व विरोधक १० मे ला झालेले रामायण महाभारत विसरून दहा समित्यांवर वर्णी लागावी म्हणून दिलजमाई करण्यास सरसावले आहेत. जिल्हा परिषदेत दहा समित्यांची स्थापना करण्यात येते. या समित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष संबंधित सभापती असतात. स्थायी समिती, शिक्षण व क्रीडा समिती, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती, आरोग्य समिती, बांधकाम समिती, अर्थ समिती, महिला व बालकल्याण समितींमध्ये प्रत्येकी आठ जिल्हा परिषद सदस्यांची निवड केली जाते. तर कृषी समितीत दहा, समाजकल्याण समितीत अकरा आणि जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीत सहा सदस्य असतात.
दहा समित्यांवर कुणाला घ्यावे, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात दोन दिवसांपूर्वी एक बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे गटनेते आणि विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कोणत्या समितीत कोणाची वर्णी लागावी यावर चर्चा झाली. त्यात सर्वानुमते पक्षाच्या संख्याबळानुसार समितीत प्रतिनिधित्व देण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती आहे. सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या सदस्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावे, अशी अपेक्षा भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण जनता करीत आहे.