कोरोना काळात घोटाळा; तत्कालीन महापालिकेचे आरोग्य प्रमुख आशिष भारतींसह तिघांवर गुन्हा

कोरोना काळात वारजे येथील महापालिकेच्या अरविंद बारटक्के रुग्णालयात अ‍ॅटिजेन कीट तपासणीतील घोटाळा समोर आला असून, रुग्णांच्या खोट्या नोंदी करून अॅटिजेन कीट तसेच इतर साहित्य बाहेरील खासगी व्यक्तींना विक्री करून सुमारे ७० ते ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  पुणे : कोरोना काळात वारजे येथील महापालिकेच्या अरविंद बारटक्के रुग्णालयात अ‍ॅटिजेन कीट तपासणीतील घोटाळा समोर आला असून, रुग्णांच्या खोट्या नोंदी करून अॅटिजेन कीट तसेच इतर साहित्य बाहेरील खासगी व्यक्तींना विक्री करून सुमारे ७० ते ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता याप्रकरणी पालिकेच्या तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याप्रकरणी डॉ. तत्कालीन आरोग्य प्रमुख आशिष भारती, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तरडे, स्टॅब सेंटरचे प्रमुख डॉ. हृषिकेश गार्डी यांच्याविरुद्ध फसवणूक व इतर कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत याबाबत डॉ. सतीश कोळसुरे (वय ४२, रा. नवी सांगवी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार वारजे येथील अरविंद बारटक्के हॉस्पिटलमध्ये २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या काळात घडला होता.

  पोलिसांच्या माहितीनुसार, कोरोना काळात संगणमतकरून २०२१ मध्ये अरविंद बारटक्के रुग्णालयात पुरविलेले कोव्हीड टेस्टसाठी लागणारे साहित्य टेस्टींग कीट, सेनिटायझर, औषधे स्वत:च्या हितासाठी व स्वार्थासाठी इतर साथीदारांना हाताशी धरून सरकारी कागदपत्रामध्ये अनेक प्रकारे फेरफार करून खोटी कागदपत्रे तयार केली. ती सत्य आहेत, असे महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिकेला दाखवून त्यात कोव्हीड टेस्टसाठी येणाऱ्या लोकांचे नोंदी वहीत खोट्या नोंदी करून ज्या टेस्टिंग किट्स आलेल्या होत्या, त्या सर्व वापरल्या आहेत असे दाखवत त्या टेस्टिंग कीट बाहेर खासगी लॅब व व्यक्तींना विक्री करून त्यांच्याकडून पैसे घेऊन सुमारे ८० ते ९० लाख रुपयांची अफरातफर केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

  ८० ते ९० लाखांची अफरातफर…

  वारजे येथील महापालिकेच्या अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर आलेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री केली. त्याजागी ११ हजारांहून अधिक बोगस रुग्णांच्या नोंदी केल्याचा प्रकार घडला. त्यांना एसएमएस जाऊ नये म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचे नंबर नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घोटाळ्यातून तब्बल ७० ते ८० लाख रुपयांची अफरातफर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंद

  याबाबत तक्रारदार डॉ. सतीश कोळसुरे यांनी अ‍ॅड. नितीन नागरगोजे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश सी. एस. पाटील यांनी वारजे पोलिसांनी १५६ (३) प्रमाणे सखोल तपास करुन अहवाल सादर करावा असा आदेश दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर तपास करीत आहेत.