समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहोचवाव्यात : मिलिंद शंभरकर

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला पाहिजे. कोणीही यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहोचविल्या गेल्या पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

    सोलापूर : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला पाहिजे. कोणीही यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहोचविल्या गेल्या पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. समाज कल्याण विभागामार्फत संविधान दिनाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या संविधान फेरीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

    संविधान फेरीची सुरूवात पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून या फेरीची सुरवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष देशपांडे, सहायक आयुक्त समाज कल्याण कैलास आढे, समाज कल्याण विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे आदि उपस्थित होते.

    फेरीमध्ये विविध महाविद्यालय व शाळेचे विद्यार्थी, सामाजिक संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान फेरी पार्क चौक येथून डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक मार्गे सात रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रम घेऊन समारोप करण्यात आला.
    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या वसतिशाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे येथील विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घेवून आपले उज्ज्वल भविष्य घडवावे. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उज्ज्वल भविष्य मिळावे म्हणून तुम्हाला शिक्षणाकरिता स्वत:पासून लांब ठेवले आहे. याची जाणीव ठेवून मेहनतीने शिक्षण पूर्ण करावे. तुम्हाला चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात याकरिता प्रशासन नेहमी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

    रॅली समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सहायक समाज कल्याण आयुक्त कैलास आढे, वालचंद कॉलेजचे प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, समाज कल्याण विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे, प्राचार्य महेश सरवदे, एस. बी. गायकवाड तसेच रमेश खाडे व समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

    प्रास्ताविकात सहायक आयुक्त समाज कल्याण आढे यांनी २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येणार असून, या कालावधीमध्ये समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी सामाजिक न्याय विभागमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी संविधान, संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार, कर्तव्ये या बाबत सखोल असे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन दत्तात्रय बनसोडे यांनी केले. यावेळी २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.