दुर्दैवी घटना! सळई डोक्यात पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू ; बांधकाम साईटचे काम बेतले जीवावर

- आईसोबत शाळेतून घरी जात असताना बाणेर परिसरात घडली घटना

    पुणे :  बाणेर परिसरात सुरू असलेल्या एका नवीन गृहप्रकल्पाचे काम सुरू असताना लोखंडी सळई डोक्यात पडून एका ९ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. हा मुलगा आईसोबत शाळा सुटल्यानंतर पायी चालत घरी निघाला होता. फुटपाथवरून जात असतानाच वरून त्याच्या डोक्यात लोखंडी सळई पडली अन् त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु, गंभीर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्या व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
    रुद्र केतन राऊत (वय ९, रा. श्रीनाथ सोसायटी, वीरभद्रनगर, बाणेर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई पूजा केतन राऊत (वय ३०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, ‘ला कमर्शिअल’ गृहप्रकल्पाचे संचालक बांधकाम व्यावसायिक तसेच अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा राऊत व त्यांचा मुलगा रुद्र बुधवारी (२२ नोव्हेंबर) दुपारी पावणे तीनच्या सुमारास शाळेतून घरी निघाले होते. नेहमीप्रमाणे ते घरी निघाले होते. दरम्यान, वीरभद्रनगर परिसरात ‘ला कर्मिशअल’ गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यावेळी रूद्र व त्याची या बांधकामासमोरून जात असतानाच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून लोखंडी सळईचा तुकडा रुद्र याच्या डोक्यात पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. सुदैवाने या घटनेत रुद्रची आई यांना पूजा बचावल्या. त्यांना दुखापत झाली नाही. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची पाहणी केली. तेव्हा तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नसल्याचे आढळून आले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात जाळी बसविण्यात आली नव्हती. सुरक्षाविषयक उपाययोजना न करता दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करत आहेत.