javhar school bus
प्रतिकात्मक फोटो

दोनच दिवसांपूर्वी दैनिक नवराष्ट्रने केला होता बस बाबत प्रश्न उपस्थित

  शिक्रापूर : पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्कूलबसच्या अपघाताच्या घटना घडत असताना दोनच दिवसांपूर्वी दैनिक नवराष्ट्र ने स्कूल बसच्या संरक्षण व विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला असताना आज (दि.१३) सकाळच्या सुमारास आमदार निरंजन डावखरे यांच्या श्री वसंतराव डावखरे मेमोरियल स्कूलच्या बसचा अपघात होऊन बस चालक व महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.

  पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे विधान सभेचे दिवंगत उपसभापती आमदार वसंतराव डावखरे यांनी स्थापन केलेली आमदार निरंजन डावखरे यांच्या मालकीची श्री वसंतराव डावखरे मेमोरियल स्कूल नावाने शाळा असून सदर शाळेची एम एच ०४ के एफ ३५६२ हि बस शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी चाललेली असताना बस मध्ये मदतनीस महिला होती. सदर बस करंदी गावचे हद्दीत पाखरे मामाचा ढाबा हॉटेल समोर आलेली असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरचा धक्का या बसला लागल्याने बस शेजारील झाडावर जोरात आदळून अपघात होऊन अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान होऊन काचा फुटल्या दरम्यान यावेळी झालेल्या अपघातात वाहन चालक संतोष आंधळे व मदनीस महिला उज्वला मोरे हे दोघे जखमी झाले.

  – सुदैवाने मोठा अनर्थ टळला
  दरम्यान दोघांना देखील उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र यावेळी बसमध्ये कोणीही विद्यार्थी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे, मात्र घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा शालेय बसच्या सुरक्षिततेसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सर्व शालेय बसची प्रादेशिक परिवहन विभाग ( आरटीओ ) कडून तपासणी व चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.

  -विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  पुणे जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या स्कूल बसच्या अपघातांच्या घटनांमुळे पालक वर्गात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सदर अपघाताबाबत बस चालक संतोष विलास आंधळे (वय २४, रा. मांढरे वस्ती शिक्रापूर चाकण रोड (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अतुल पखाले हे करत आहे.