विमा नसतानाही धावताहेत स्कूलबस; शिरुर तालुक्यातील खासगी शाळांच्या बससेवेबाबत पालकांची नाराजी

खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा चुकीच्या पद्धतीने वापर सुरु असल्याने शिरुर तालुक्यातील शाळेंच्या बसवर अंकुश कोणाचा असा प्रश्न पडत आहे. विमा नसतानाही बस चालवल्या जात असल्याचे समाेर आले असून याबाबत पालकांमध्ये नाराजी आहे.

  शिक्रापूर : शिरुर तालुक्यात सध्या खासगी शाळांचा संख्या माेठी असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांकडूनही शाळा उभारलेल्या आहेत. यातील अनेक खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा चुकीच्या पद्धतीने वापर सुरु असल्याने शिरुर तालुक्यातील शाळेंच्या बसवर अंकुश कोणाचा असा प्रश्न पडत आहे. विमा नसतानाही बस चालवल्या जात असल्याचे समाेर आले असून याबाबत पालकांमध्ये नाराजी आहे.

  शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात सध्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा अनेक आहेत. शाळांचे मोठे जाळे तयार झाले असून, या शाळांच्या प्रसानाकडून मनमानी सुरु असून पालकांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस सुरु आहेत, तर काही शाळांमध्ये त्यांच्याच मर्जीतील दुकानातून गणवेश, पुस्तके आदी साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांना वेठीस धरले जात आहे. बसचे पैसे न भरल्यास विद्यार्थ्यांना कित्येकदा बसमध्ये प्रवेश दिला जात नाही तर परीक्षेचे पैसे न दिल्यास परीक्षेपासून रोखले जात असल्याबाबत यापूर्वी शिरुर तालुक्यातील अनेक शाळांच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयांकडे करण्यात आल्या आहेत.

  इंग्लिश माध्यामाच्या सर्व शाळा बसची सुविधा देखील देत आहेत. नुकतेच पुणे जिल्ह्यातील काही शाळांच्या बसेसचे अपघात झाल्याच्या घटना समोर आल्याने शिरुर तालुक्यातील काही शाळांच्या बसेसची माहिती घेतली असता काही स्कूल बसचा विमा नसल्याचे समाेर आले आहे. काही वर्षांपासून या बससाठी विमा घेतला नसल्याचे समोर आले आहे. शिरुर तालुक्यातील एका राजकीय नेत्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या बसचा देखील विमा नसल्याचे समोर आले. अनेक वाहने चुकीच्या पध्दतीने व बेकायदेशीरपणे रस्त्यावर सुरु असून धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे, मात्र राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे याकडे कोणीही लक्ष देत नाही असे दिसते. वाढत्या वाहतुकीमुळे एखाद्या बसबाबत दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात असून, शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा नाही का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

  तालुक्यात रंगतेय चर्चा

  शिरुर तालुक्यात अनेक राजकीय व्यक्तींच्या खासगी शाळा असून, पत्नीच्या नावे असलेल्या बस मधून विद्यार्थ्याची वाहतूक केली जात आहे. विमा संपून देखील बस शाळेमध्ये वापरणारा राजकीय पुढारी कोण अशी चर्चा रंगू लागली आहे.

  याेग्य कारवाई करणार

  शिरुर तालुक्यातील सर्व शाळांच्या बसचे नंबर घेण्यात येणार आहेत. बसबाबत चौकशी करुन त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला माहिती देऊन शाळांना नोटीस देऊन योग्य कारवाई करणार असल्याचे शिरुर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी सांगितले.