varsha gaikwad

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्य पुन्हा शाळा बंद (School Closing) करण्याचा विचार करू शकते असे म्हटले आहे.

    मुंबई : विद्यार्थ्यांसाठी नुकतीच शाळा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र देशात ओमायक्रॉनची भीती वाढत असताना, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्य पुन्हा शाळा बंद (School Closing) करण्याचा विचार करू शकते असे म्हटले आहे. देशात सध्या ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण (Omicron Patients In India) आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते.  आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र ओमायक्रॉनचे रुग्ण वाढल्यास आता पुन्हा शाळा बंद होण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्रातील ओमायक्रॉनचा प्रसार वाढल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. देशातील एकूण २१३ ओमायक्रॉन रुग्णांपैकी महाराष्ट्रात ५४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. “ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

    दरम्यान, काही राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी राज्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांसाठी धोरणे राबवण्याच्या शिफारशी करण्यात आल्याचे भूषण यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवलं असून स्थानिक परिस्थितीनुसार काळजी घ्यावी असं सांगितलं आहे. तसंच गरज लागल्यास मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी असंही म्हटलं आहे.