Maratha Reservation
Maratha Reservation

    How Many Kunbi Records Found in Maharashtra : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली असताना, आता राज्य सरकारकडूनसुद्धा मराठा आरक्षणावर जोरदार काम सुरू आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ दिला आहे. यानंतर राज्य सरकारकडून राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंत संपूर्ण राज्यभरात कुणबींच्या हजारो नोंदी सापडल्या आहेत.

    नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ७६ हजार कुणबी नोंदी

    नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ७६ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी १८९७ ते १९२९ काळातील असल्याची माहिती आहे. यातील ३ हजारांपेक्षा जास्त नोंदी शहरात सापडल्या आहेत. समितीच्या् माध्यमातून कुणबी नोंदी तपासण्याच काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नाशिक महापालिकेकडूनही शहरात स्वतंत्रपणे कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाखांहून अधिक कुणबी नोंदी तपासण्यात आल्या आहेत. अजूनही नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे.

    मराठवाड्यातसुद्धा सापडले कुणबी जातीचे दाखले सापडले

    दुसरीकडे मराठवाड्यातदेखील कुणबी जातीचे दाखले शोधण्याचे काम सुरू आहे, आतापर्यंत १,७४,४५,४३२ कागद तपासण्यात आले आहेत. त्यात १४ हजार ९७६ पुरावे कुणबी जातीचे सापडले आहेत, मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ७६ तालुक्यांत तब्बल ८ हजार १२६ गावात हे पुरावे सापडले आहेत. सापडलेल्या नोंदीपैकी ९ हजार ७५५ कागदपत्रे तपासून वेबसाईट्सवर ४ हजार २८२ कागदपत्रे अपलोड झाले आहेत.

    कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी सापडल्या?
    नाशिक जिल्ह्यात ७६ हजार कुणबी नोंदी सापडल्या. अहमदनगर जिल्ह्यात ५७,६८८ कुणबी नोंदी सापडल्या. जळगाव जिल्ह्यात ४५,७२८ कुणबी नोंदी सापडल्या. धुळे जिल्ह्यात ३१,४५३ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पुणे जिल्ह्यात जवळपास २० हजार कुणबी नोंदी सापडल्या.

    कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू

    कोल्हापूर जिल्ह्यात ५ हजार ५६६ कुणबी नोंदी सापडल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ हजारांहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या. सध्या अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. यात आणखी वाढ होऊ शकते. माहिती माहिती प्राप्त होताच ती अपडेट करण्यात येईल.