
पुणे : पैंजण किंवा पायल या दागिन्याला आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. हेच लक्षात घेत पैंजण, आपली भारतीय संस्कृती याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशातून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्स यांनी तब्बल १० किलो वजनाचे सर्वांत मोठे चांदीचे पैंजण घडविले आहे.
तेजपाल रांका व श्लोक रांका यांच्या संकल्पनेतून रांका ज्वेलर्सने सदर पैंजण घडविले गेले असून ५ कारागिरांनी दिवस-रात्र २ महिने यासाठी मेहनत घेतली आहे.
महत्वाचा दागिना म्हणजे पैंजण
याबद्दल अधिक माहिती देताना तेजपाल रांका म्हणाले, अगदी पूर्वीपासून लहान बाळ ते अगदी मोठ्या महिलांपर्यंत पायात चांदीचे पैंजण घालण्याची प्रथा आपल्याकडे आहे. भारतीय संस्कृतीनुसार जे सोळा शृंगार सांगितले आहेत, त्यातील एक महत्वाचा दागिना म्हणजे पैंजण. पैंजण चांदीची असावी, यामागे सौंदर्यासोबतच भारतीयांचा आरोग्याचाही दृष्टीकोन आहे. चांदीचे पैंजण घातल्याने स्त्रियांना आरोग्याचे विविध लाभ मिळू शकतात, अशी आपली धारणा आहे.
महाराष्ट्रातील पहिले सर्वात मोठे व वजनदार पैंजण
याच बाबी लक्षात घेत पैंजण आणि आपली भारतीय संस्कृती यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने आम्ही हे पैंजण बनविले असून, सदर पैंजण देशातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले सर्वात मोठे व वजनदार पैंजण आहे. या पैंजणामध्ये सेमी प्रेशिअस स्टोनचा वापर करण्यात आलेला असून याची किंमत रुपये ८ लाख ५० हजार इतकी आहे. रांका ज्वेलर्सच्या पिंपरी चिंचवड व पुणे, बंडगार्डन रोड येथील दालनांमध्ये सदर पैंजण १८ ऑगस्ट पर्यत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले असून सर्वांनी आवर्जून हे पैंजण पाहण्यास यावे, असे आवाहन रांका ज्वेलर्स तर्फे करण्यात आले आहे.