शिर्डी विमानतळाच्या सुरक्षेला भगदाड; पहिल्याच पावसात झालं असं काही…

गेल्या चार वर्षांपूर्वी साई शताब्दीच्या सुरुवातीला अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) कार्यान्वित झाले. मात्र, गुरुवारी झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने विमानतळाच्या दक्षिण आणि बाजूकडील सुरक्षा भिंत कोसळण्याची घटना घडली.

    शिर्डी : गेल्या चार वर्षांपूर्वी साई शताब्दीच्या सुरुवातीला अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) कार्यान्वित झाले. मात्र, गुरुवारी झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने विमानतळाच्या दक्षिण आणि बाजूकडील सुरक्षा भिंत कोसळण्याची घटना घडली. तब्बल चार ठिकाणी ही भिंत कोसळल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
    एका ठिकाणी तर भिंत पूर्णपणे पडली तर एका ठिकाणी सुरक्षा भिंतीमध्ये तीन ते चार फुटावर मोठे भगदाड पडल्याने कुत्रे आणि इतर प्राण्यांसह कोणीही आतमध्ये सहज प्रवेश करू शकतो. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. विमानतळाचे क्षेत्रफळ पाहता अशाप्रकारे चार ठिकाणी भिंत कोसळणे, हे संरक्षक भिंतीच्या निकृष्ट बांधकामाच उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
    आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असलेल्या शिर्डी विमानतळावर निकृष्ट काम आणि कुचकामी काम असेल तर भविष्यात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्कीच मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देईल. त्यामुळे विमान प्राधिकरण आणि राज्य सरकारने योग्य उपाययोजना करून कमी कालखंडात साईबाबांच्या पवित्र भूमीतील या विमानतळाची प्रतिष्ठा जपावी. एवढीच माफक अपेक्षा साईभक्तात आणि शिर्डी ग्रामस्थांच्यात असणार आहे.