मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका ; संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांचा इशारा

सणसर, भवानीनगरमध्ये कडकडीत बंद

    बारामती:  जालना जिल्ह्यात मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्ज ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप करून मराठा समाजाच्या संयमाचा अंत शासनाने पाहू नये, अन्यथा मराठा समाज आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी बोलताना दिला.

    जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ सणसर, भवानीनगर या ठिकाणी सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवून तीव्र निषेध करण्यात आला. त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने भवानीनगर मधून मोर्चा काढून नंतर जाहीर सभा झाली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली. भवानीनगर येथील व्यापार पेठेत मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. त्यावेळी प्रशांत पवार बोलत होते.

    यावेळी पवार म्हणाले, शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधव आंदोलन करत असताना जाणीवपूर्वक त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये महिला देखील जखमी झाल्या. या घटनेला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. शासनाने मराठा आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. हा समाज आतापर्यंत संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहे, मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. शिवसेनेचे विजय शिरसट म्हणाले, फडणवीस सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या कोकणासारख्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रकल्प माथी मारण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही हे सरकार दिशाभूल करण्याचे काम करत आहे. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्याचे महापाप पोलिसांच्या माध्यमातून या सरकारने केले असल्याचा आरोप शिरसट यांनी यावेळी केला. इंदापूर खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे यांनी मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे हेमंत निंबाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण ननवरे आदिंसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.