दीड लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; वाहनात मद्याचे २० बॉक्स आढळले

जुन्नर (Junnar) तालुक्यातील आणे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये गोवा राज्य निर्मीत १ लाख ५३ हजार १८० रूपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा, महिंद्रा कंपनीचे बोलेरो चार चाकी वाहन आणि दोन मोबाईल असे मिळून ९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.

    पुणे : जुन्नर (Junnar) तालुक्यातील आणे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये गोवा राज्य निर्मीत १ लाख ५३ हजार १८० रूपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा, महिंद्रा कंपनीचे बोलेरो चार चाकी वाहन आणि दोन मोबाईल असे मिळून ९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली. आरोपीकडून महिंद्रा बोलेरो वाहन ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगावचे निरीक्षक अर्जुन पवार व दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे यांनी दिली.

    वाहनात मद्याचे २० बॉक्स आढळले

    त्रिभुवन हिरामन लष्करे ( वय- ४४, रा. गोरेगाव, ता. पारनेर, जि. नगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती देताना ठेंगडे म्हणाले, मंगळवारी (ता.१७ ) नगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील आणे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर बोलेरो वाहनात गोवा राज्य निर्मीत विदेशी मद्य असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन संशयीत वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली. त्यावेळी बोलेरो या वाहनात बॉक्समध्ये गोवा राज्य निर्मीत आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीकरीता प्रतीबंधीत असलेले विदेशी मद्य मिळून आले. यामध्ये इंपेरियल ब्ल्यू व्हिस्की १८० मिलीच्या ३३६ सीलबंद बाटल्या ( ७ बॉक्स ), रॉयल स्टॅग व्हिस्की १८० मिलीच्या ३८४ सीलबंद बाटल्या (८ बॉक्स), मॅकडॉल नं१ व्हिस्की २ लिटर क्षमतेचे २० बाटल्या (०५ बॉक्स) अशा एकूण १ लाख ५३ हजार १८० रूपये किंमतीच्या विदेशी मद्य साठ्याचा समावेश होता. संबंधित वाहन आणि वाहन चालकाच्या ताब्यातील दोन मोबाईल असा एकूण ९ लाख १४ हजार ८८० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

    कारवाईत यांचा सहभाग

    राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्क संचालक सुनिल चव्हाण यांच्या आदेशान्वये विभागीय उप-आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक सी. बी. राजपूत, उप-अधीक्षक युवराज शिंदे, उप-अधीक्षक एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अर्जुन पवार, दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे, दुय्यम निरीक्षक एम. एस. धोका, विजय विंचुरकर, जयदास दाते, संदीप सुर्वे, अंकुश कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस.एफ. ठेंगडे हे करीत आहे.