third gender sejal

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील तृतीयपंथीय असलेल्या सेजलला प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातच सेतू सुविधा केंद्र (First Transgender In India To Run Setu Center) हस्तांतरीत केले आहे.

    भारतीय राज्यघटनेने तृतीयपंथीय (Transgender) अर्थात किन्नरांनाही समान अधिकार बहाल केलेले आहेत. त्यांचे जीवन अधिक सुसह्य व्हावे यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. दरम्यान नांदेड (Nanded) जिल्ह्यातील तृतीयपंथीय असलेल्या सेजलला प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातच सेतू सुविधा केंद्र (First Transgender In India To Run Setu Center) हस्तांतरीत केले आहे. त्यामुळे नांदेडची सेजल भारतातील पहिली तृतीयपंथीय सेतू केंद्र चालक बनली आहे.

    तृतीयपंथीय समाज आता मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक तृतीयपंथीय आता चांगलं आणि दर्जेदार शिक्षण घेऊन आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. सेजलने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आता सेतू केंद्र सुरु करत देशात इतिहास रचला आहे.

    स्वतः तृतीयपंथीय असलेल्या नांदेडच्या गौरीने तिच्यासारख्या अनेकांना आतापर्यंत आसरा देत त्यांच्या शिक्षणाची जवाबदारी उचलली. उत्तर प्रदेशच्या सेजलला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी ती तृतीयपंथीय असल्याने घरातून काढून दिले. त्यानंतर सेजल वयाच्या आठव्या वर्षी गौरीला येऊन भेटली. गौरीने तिला बीकॉमपर्यंत शिकवलं.

    सेजलचं शिक्षण पाहता काही सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने देशातील पहिले तृतीयपंथीयांचे सेतू सुविधा केंद्र सेजलला मिळाले आहे. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच किन्नर सेजलला सेतू सुविधा केंद्र जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सन्मानपूर्वक हस्तांतरीत केले.