महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

  पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने फुलगाव, पुणे येथे होणाऱ्या ६६व्या माती व गादी राज्य अजिंक्य स्पर्धा व मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने रविवार दि. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी मंगळवार पेठ येथील छत्रपती स्टेडियम येथे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली.
  या वजनी गटात होणार स्पर्धा
  चाचणी स्पर्धा माती आणि गादी अशा दोन विभागात होणार आहे. माती व गादी विभागामध्ये ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ व ८६ ते १२५ किलो (महाराष्ट्र केसरी गट) वजनी गटामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
  निवडचाचणी स्पर्धा केवळ पुणे शहर व जिल्ह्यातील खेलाडूंसाठीच
  या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची वजने स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेत घेतली जाणार आहेत. तसेच खेळाडूंनी तीन फोटो, आधार कार्डची छायांकित प्रत व मूळ आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक आहे. सदर निवडचाचणी स्पर्धा केवळ पुणे शहर व जिल्ह्यातील खेलाडूंसाठीच आहे. या स्पर्धेमध्ये वजनगटात एका किलोची सुट आहे.
  या स्पर्धेत खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा
  या स्पर्धेत खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी वस्ताद गणेश दांगट, पै. अविनाश टकले, पै. योगेश पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी केले आहे.