स्व. गणपतराव सपकळ यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी : दत्तात्रय भरणे

स्वर्गीय गणपतराव सपकळ यांचे सामाजिक योगदान प्रेरणादायी आहे, त्यांच्या विचारांचा आदर्श नव्या पिढीला निश्चित मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलताना व्यक्त केला.

    बारामती : स्वर्गीय गणपतराव सपकळ यांचे सामाजिक योगदान प्रेरणादायी आहे, त्यांच्या विचारांचा आदर्श नव्या पिढीला निश्चित मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलताना व्यक्त केला. संजय नगर तालुका इंदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्वर्गीय गणपतराव सपकळ यांनी पाच गुंठे जागा दिल्याबद्दल या शाळेला त्यांचे नाव देण्यात आले. सदर नामकरण समारंभ व या परिसरात वृक्षारोपण आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

    या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, छत्रपती कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, माजी संचालिका स्वाती सपकळ, इंदापूरचे नगरसेवक प्रकाश ढवळे, विक्रम निंबाळकर, गणपती आप्पा सोसायटीच्या चेअरमन स्वाती सपकळ, अर्चना सपकळ, वसंत जगताप, शिवाजी सपकळ, शिवाजी सपकळ, धनंजय सपकळ, कल्याण पवार, महेश सपकळ, हनुमंत वाघमारे, विश्वजित सपकळ, धीरज थोरात, विश्वास कबीर आदि मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी आमदार भरणे म्हणाले, स्व. गणपतराव आप्पा यांनी छत्रपती कारखान्यामध्ये काम करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी या परिसरात जिल्हा परिषद शाळेला उदात्त हेतूने पाच गुंठे जागा दान केली. त्यांची ही दानशूरता कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या समाजकारणाचा वसा भाऊसाहेब सपकळ व त्यांचे कुटुंबीय पुढे घेऊन जात आहेत. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मारुती मंदिरासाठी आपण पाच लाख रुपयांचा निधी त्वरित मंजूर करत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच शाळेसाठी क्रीडा साहित्यही उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक भाऊसाहेब सपकळ यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक महावीर ठोंबरे, अनिल घोळवे, सत्तजित सपकळ यांनी केले. सूत्रसंचालन गणेश सपकळ यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले.

    झालं गेलं गंगेला मिळालं…

    दत्तात्रय भरणे यांनी यावेळी आपल्या भाषणात यापूर्वी झालं गेलं, गंगेला मिळालं, हिशोब बराबर! असं म्हणत यापूर्वी झालेले मतभेद विसरून एकत्र काम केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.