स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर अडवणार; शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून गतवर्षीचा १०० रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला नाही. तातडीने शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. ते पैसे आमच्या हक्काचे आहेत. मागील थकीत पैसे घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी लोकसभा निवडणुका झाल्यावर साखर अडवणार आहे. असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

    कोल्हापूर : साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून गतवर्षीचा १०० रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला नाही. तातडीने शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. ते पैसे आमच्या हक्काचे आहेत. मागील थकीत पैसे घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी लोकसभा निवडणुका झाल्यावर साखर अडवणार आहे. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत साखर कारखान्यातून निघणाऱ्या साखरेची वाहने बाहेर सोडणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

    अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, शैलेश आडके, विठ्ठल मोरे यांची भाषणे झाली. यावेळी सहदेव चौधरी, सचिन शिंदे, आप्पा पाटील, पोपट अक्कोळे, महावीर गिरमल, जयश्री पाटील, मिलिंद साखरपे, राम शिंदे, सागर शंभुशेटे आदी उपस्थित होते.

    शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना गुलाम करण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. माझी लढाई त्या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आहे. इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र झाला पण धनदांडग्यांनी सामान्य माणसाला पारतंत्र्यात ठेवले आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदार माझ्या विरोधात एकवटले आहेत. गेल्या ५ वर्षांत मी स्वस्थ बसलो नाही. सर्वसामान्यांची हक्काची लढाई लढत आलो आहे. गेली ३० वर्षे शेतकरी चळवळ चालवत आलो आहे.

    सरकारकडून शेतकऱ्यांची पिळवणूक

    महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची वाट लागली आहे. महापुराच्या काळात पूरग्रस्त शेतकऱ्यांची सरकारने थट्टा केली. ५० हजार शेतकरी जलसमाधी घेण्यासाठी नृसिंहवाडीत आले होते. तरीही महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांची दया आली नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी त्यावेळी वाऱ्यावर सोडले. महायुती व आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची पिळवणूक झाली आहे, असेही म्हणाले.