ऊस दराचा तिढा सुटला! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन अखेर स्थगित

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मागच्या ८ तासांपासून सुरू असलेल्या चक्काजाम  आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. मागील हंगामातील १०० रुपये आणि पुढील हंगामातील १०० रुपये प्रमाणे कारखानदारांनी आपली मागणी मान्य केली आहे. राजू शेट्टी यांच्या मागणीला अखेर यश आल्याने घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

  कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मागच्या ८ तासांपासून सुरू असलेल्या चक्काजाम  आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. मागील हंगामातील १०० रुपये आणि पुढील हंगामातील १०० रुपये प्रमाणे कारखानदारांनी आपली मागणी मान्य केली आहे. राजू शेट्टी यांच्या मागणीला अखेर यश आल्याने घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तोडगा निघाला आहे आता सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी लवकरात लवकर मार्ग काढायचा असल्याचे शेट्टी म्हणाले.
  जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रानुसार, याबाबत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगाम सन २०२२-२३ मधील शेतकऱ्यांना मिळालेल्या उसाच्या दराविषयी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांची आंदालने सुरु झाली होती.त्याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये ठरविण्यात येत आहे की, मागील हंगामामध्ये शेतकऱ्यांना उसाचा दर प्रती टन ३ हजारपेक्षा कमी ज्या साखर कारखान्यांनी दिलेला आहे. त्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांना १०० रुपये अतिरिक्त प्रती टन द्यावे.ज्यांनी ३ हजारपेक्षा जास्त दर प्रती टन दिलेला आहे त्या साखर कारखान्यांनी ५० रुपये प्रतीटन अतिरिक्त शेतकऱ्यांना द्यावेत. याबाबीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा व पुढील दोन महिन्यांमध्ये त्यास मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना यांना दिले आहे.

  पालकमंत्र्यांचे आवाहन
  दोन महिन्यानंतर वरीलप्रमाणे अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी देण्याची आहे. तरी सर्व साखर कारखान्यांनी याप्रमाणे आपले संमतीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आणून द्यावे, असे आवाहन सर्व साखर कारखान्यांना पालकमंत्र्यांनी केले आहे. या आश्वासनाप्रमाणे जिल्ह्यात चालू असणारे मागील हंगामासाठी वाढीव उसाचे दर मागणी विषयीचे आंदोलन व आजचे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

  काय म्हणाले शाहू महाराज?
  यावेळी आंदोलकांशी संवाद साधत असताना शाहू महाराज म्हणाले, राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून राजू शेट्टी ऊस दराच्या मागणीवरून आंदोलन करत आहेत. परंतु साखर कारखाने दखल घेतली नाही. सरकारही मध्यस्थी करताना दिसत नाही.शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर मध्यस्थी करून मार्ग काढणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तडजोड करावी, असे आवाहन शाहू महाराजांनी यावेळी केले.