किराणा दुकानात दारू विक्री ; चंदगड तालुक्यात गोवा बनावटीच्या मद्याची राजरोस विक्री

चंदगड तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठाच्यां मोठ्या गावातील किराणा दुकानातून गोवा बनावटीच्या मद्याची (दारुची), आणि बिअरची विक्री दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू आहे. कमी किंमतीत आणून दाम दुप्पट रक्कमेने विक्री केली जात आहे.

  विजयकुमार कांबळे, चंदगड : चंदगड तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठाच्यां मोठ्या गावातील किराणा दुकानातून गोवा बनावटीच्या मद्याची (दारुची), आणि बिअरची विक्री दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू आहे. कमी किंमतीत आणून दाम दुप्पट रक्कमेने विक्री केली जात आहे. त्यामुळे तळीरामांच्या खिशाला ही कात्री लावली जात आहे. अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो….असे म्हणत मोठी रक्कम देऊन खरेदी करण्याची वेळ तळीरामांवर आली आहे. मात्र गावच्या प्रमुंख आणि तालुक्याच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर मोठे आव्हान उभे आहे.

  तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावठी दारू विक्री करणाऱ्या कुटूंबाकडून मोठी एन्ट्री घेतली जात असल्याचेही ठिकठिकाणी बोलले जात आहे. आणि त्यांना फुल्ल परवानगीने विक्री करण्यास सांगितले जात असल्याचीही चर्चा होत आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या गावठी दारू विक्रेत्यांकडून ठराविक तारखेला संबंधित अधिकाऱ्यांना ती ठरलेली अर्थ पूर्ण रक्कम न मिळाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा दाखवून गुन्हा नोंद केला जातो. परंतु किराणा मालाच्या नावाखाली दुकान मालकांनी चालविलेल्या या गोवा बनावटीच्या दारू विक्रीचा धंदा मात्र जोरात सुरू आहे. गावातील प्रमुख लोकांना हाताशी धरून गोवा बनावटीच्या व वाईन शॉपमधून विक्री साठी आणलेल्या दारुचा साठा दुकानात केला जातो. दारु साठा असल्याची माहिती संबंधीत गावातील मुख्य समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांना माहित असून देखील आपल्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना कळविले जात नाही.

  मर्जीतील लोकांची नावे राहतात गुप्त
  आपल्या मर्जीतील लोकांची नावे गुप्त ठेवण्यात गावच्या अधिकाऱ्यांनी धन्यता मानली आहे.त्यामुळे गावा -गावात दारुचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्या किराणा दुकान मालक विक्रेत्यांचा शोध घेवून त्यांना पकडणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यां समोर मोठे आव्हान उभे आहे. किराणा दुकानातील दारू पकडण्यात पोलीसांना यश मिळणार काय.? त्या विक्रेत्यांवर कारवाई करणार काय.? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

  यात्रा जत्रेत तळीरामांचा शिमगा
  म्हाई-जत्रा आणि लक्ष्मी यात्रा आल्यास त्या काळात किराणा दुकान मालक व्यवसायिक मंडळी गिहाईकांच्याकडून मनमानी दर घेऊन दिवाळी साजरी करतात. गिऱ्हाईकांकडून वाटेल त्या दराने दारुची विक्री करुन एक प्रकारे लुट केली जाते. तर ‘एकच प्याला’ म्हणून सेवन करणाऱ्या तळीरामांचा मात्र शिमगा होतो, असे तळीरामानी आपल्या मिश्किलपणे भावना व्यक्त केल्या. या व्यवसायाला संबंधित अधिकाऱ्यांचे आशत्रर्वाद असल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केली जात आहे.