सोशल मिडीयाच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

पुण्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ ‌विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे.

    पुणे : पुण्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ ‌विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा लाखांचा मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला आहे.

    आकाश महेंद्र ठाकर (वय २२) व अनिकेत जर्नादन धांडेकर (वय २०, रा. दोघेही हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व त्यांच्या पथकाने केली.

    पुण्यात विद्यार्थी संख्या तसेच आयटी क्षेत्रात व नोकरी करणाऱ्या तरूणांची संख्या मोठी आहे. हे तरुण अमली पदार्थ तस्कारांचे प्रमुख टार्गेट आहेत. पण, पोलिसांचा ससेमिरा पाठिमागे लागल्याने वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. अमली पदार्थांसाठी नावाचे कोड देखील दिले गेल्याचे समोर आले होते. आता सोशल मिडीयाचा आधार घेऊन त्याची विक्री केली जात असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

    दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक माहिती घेत असताना सिंहगड रस्त्यावरील ब्रम्हा हॉटेल चौकातून रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अखिल ओमकार मित्र मंडळ परिसरात दोघे अमली पदार्थ विक्रीसाठी आल्याचे समजले. यानूसार पथकाने आकाश ठाकर याला पकडले. त्याची झडती घेतली असता ४७ हजार ६५० रुपयांचा चरस मिळाले. तर अनिकेत याच्याकडून ८६ हजारांचे मेफेड्रॉन हा अमली पदार्थ मिळाला. दोघांनी अमली पदार्थ अज्ञात व्यक्तींकडून विकत घेतले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. पोलीस आता या अज्ञात व्यक्तीचा तपास करत आहेत. यापुर्वी त्यांनी अमली पदार्थांची तस्करी केली का याचा तपास पोलीस करत आहेत.