ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

साहित्यिक अनिल अवचट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सुरुवातीला संचेती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांनी पत्रकार नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

  पुणे: वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं.वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

  साहित्यिक अनिल अवचट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सुरुवातीला संचेती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांनी पत्रकार नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

  अल्प परिचय

  अवचट यांनी पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली होती. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच बीजेमधील मित्र डॉ. कुमार सप्तर्षी आणि डॉ. जब्बार पटेलांसारख्या मित्रांसोबत सामाजिक जागृती, विकास आणि क्रांती या विषयावर त्यांच्या चर्चा चालायच्या. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली. पुढे या तिन्ही मित्रांनी डॉक्टरीपेक्षा सोडून कला, समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. अवचट यांनी लेखन आणि सामजसेवेला वाहून घेतले होते.

  अवचटांची ग्रंथ संपदा

  अमेरिका , अक्षरांशी गप्पा , आपले’से’ , आप्‍त , कार्यमग्न, कार्यरत, कुतूहलापोटी कोंडमारा , गर्द , छंदांविषयी , छेद , जगण्यातले काही , जिवाभावाचे , दिसले ते , धागे आडवे उभे इत्यादी

  पुरस्कार

  व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार
  अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार
  महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार
  2017 सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार
  “सृष्टीत.. गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार
  डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने ‘सर्वोत्कृष्ट पुस्तके’ म्हणून जाहीर केली आहेत.
  अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
  सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार
  साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार
  महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार
  डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला 12व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (2015) प्रदान करण्यात आला.
  अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार