ऊस दराचा स्वतंत्र फॉर्म्युला शेतकऱ्यांच्या लुटीसाठीचं, कोल्हापूरप्रमाणे दर द्या अन्यथा…; राजू शेट्टींचा इशारा

१ डिसेंबरला इस्लामपुरात राजारामबापू साखर कारखान्याचा काटा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

  इस्लामपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ११० कोटींची लूट करण्यासाठी ऊस दराचा स्वतंत्र फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी काढला आहे. आम्हाला तो अजिबात मान्य नाही. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराबाबत झालेला तोडगा तसाच कायम ठेवावा. अन्यथा १ डिसेंबरला इस्लामपुरात राजारामबापू साखर कारखान्याचा काटा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

  राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सरासरीने किती कोटींची लूट करणार आहेत याचा पाढा वाचला. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा आहे. सांगली जिल्ह्यातील कारखानदार आंदोलनाला दाद देत नाहीत. त्यांनी केलेल्या नवीन फॉर्म्युल्यावर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. पुढारीच आपले पैसे वाचवत आहेत. नेत्यांनी आपल्या सोयीप्रमाणे ऊस दराचा फॉर्म्युला बनवल्याचे स्पष्ट होत आहे.

  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ९६ कोटी ४६ लाखांचा फटका यंदा बसेल. तर गेल्या हंगामातील बारा कोटी ५२ लाखाचा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. जिल्ह्यातील कारखानदारीत राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव व कारंदवाडी या तीन युनिट मधूनच दोन्ही हंगामातील ऊस दराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. असं शेट्टी म्हणाले.

  पुढे बोलतांना ते म्हणाले, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीत फारसा बदल नाही असे असले तरी सांगली जिल्ह्यात ज्यादा रिकव्हरी असणारे कारखाने आहेत. तरीही कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबरीने दर देत नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पुरवठा बंद करावा. कारखानदारांना अद्दल घडवण्याची हीच वेळ आहे. भविष्यात साखरेचे भाव वाढणारच आहेत. देशाच्या सुधारित अंदाजपत्रकानुसार २९१ लाख टन साखरेची गरज आहे तर यंदा २८१ लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे. तर जागतिक पातळीवर २१ लाख टनाचा तुटवडा आहे.

  अशा परिस्थितीत ऊस दराच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटल्यानंतर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस दराबाबत योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता. मात्र शेतकऱ्यांच्या लुटीचा फंडा त्यांनी अवलंबल्याने आम्ही आंदोलन गतिमान करणार आहोत. असंही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितलं.

  यामागे गौडबंगाल काय ?

  ऊस आंदोलनामध्ये गाड्यांचे टायर फोडले तर गुन्हे दाखल करण्यात पोलिसांची तत्परता दिसली. आंदोलनादरम्यान आम्ही साखरेची वाहतूक करणारे ६० हून अधिक ट्रक आडवले. तेव्हा मात्र सोयीस्करपणे गुन्हे दाखल झालेच नाहीत. यामागे गौडबंगाल काय ? शेतकऱ्यांची लूट करून काटा मारलेलीचं अतिरिक्त साखर वाहतूक असल्यानेच गुन्हे दाखल झाले नाहीत असा दावा राजू शेट्टी यांनी केला.