महायुतीकडून पैशांचा पाऊस! दोन हजार कोटींचे वाटप; रोहित पवार यांचा गंभीर आरोप

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर मतदानापूर्वी पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महायुतीकडून दोन हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

    नाशिक : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम दिसून येत आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघातील मतदान पार पडले आहे. बारामतीसह, अहमदनगर, शिरुर आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर मतदानापूर्वी पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महायुतीकडून दोन हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

    बारामतीमध्ये 150 कोटी रुपये खर्च

    नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. महायुतीकडून पैशाचे वाटप होत असून याचा अनुभव दोन टप्प्यांमध्ये आलाच असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले, “महायुतीकडून एकूण दोन हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. बारामतीमध्ये तब्बल 150 कोटी रुपये खर्च करण्यात आला. पोलिस व्हॅन, रुग्णवाहिका, टॅंकर मधून पैसा आणण्यात आला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात झाली. याचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे,” असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

    नाशिक आणि दिंडोरीमध्ये पैसे वाटप होईल

    नाशिकच्या प्रचारासाठी आलेल्या रोहित पवार यांनी महायुतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाशिकमध्ये बॅगा भरून पैसे आणल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री मुक्कामी राहणार नव्हते. आता फाईल सही करु शकत नाही. असे असताना 9 बॅगा कशासाठी आणल्या. असा प्रश्न उपस्थित होतो. नाशिक आणि दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सामान्य आहेत. महायुतीचे उमेदवार बलाढ्य आहेत. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरीमध्ये पैसे वाटप होईल,” असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.