जिल्हा बँकेच्या माध्यमातून सेवा सोसायट्या सक्षम करणार : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठीच जिल्हा बँकेची स्थापना झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारणाचा चेहरा-मोहरा बदलायचा असेल तर शेवटच्या माणसापर्यंत जिल्हा बँक पोहोचली पाहिजे. विकास सेवा सोसायट्या सक्षम असल्या पाहिजेत, त्या नफ्यात चालल्या पाहिजेत.

    जयसिंगपूर : सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठीच जिल्हा बँकेची स्थापना झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारणाचा चेहरा-मोहरा बदलायचा असेल तर शेवटच्या माणसापर्यंत जिल्हा बँक पोहोचली पाहिजे. विकास सेवा सोसायट्या सक्षम असल्या पाहिजेत, त्या नफ्यात चालल्या पाहिजेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सेवा सोसायट्या अधिक बळकट करण्यासाठी आपले प्राधान्य राहील. सहकाराचा वारसा सांगणार्‍या शिरोळ तालुक्यात अनेक सेवा संस्था नफ्यात असल्या आणि उत्तम काम करीत असल्या तरी उर्वरीत संस्थाही नफ्यात चालविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजनांची माहिती शेतकर्‍यांना व्हावी, तसेच सेवा संस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शिरोळ तालुका विकास सेवा संस्थांची आढावा बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक ए.बी.माने, नाबार्डचे व्यवसाय विकास अधिकारी आशितोष जाधव प्रमुख उपस्थित होते. यावेळी यड्रावकर पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात बैठक झाली नाही. या काळात सोसायटीच्या स्तरावर अडचणींचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. सोसायट्यांनी शेतकर्‍यांना कर्ज देणे व त्याची वसुली करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता नाबार्डच्या योजनांच्या माध्यमातून अधिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत.

    जिल्हा बँक शेतकऱ्यांची मुख्य अर्थवाहिनी
    कोल्हापूर जिल्हा हा सहकाराचा अग्रणी समजला जातो. राज्याने, देशानेच नव्हे तर जगाने आदर्श घ्यावा अशा पध्दतीने सहकार चालविण्याची परंपरा या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. जिल्हा बँक ही येथील शेतकऱ्यांची मुख्य अर्थवाहिनी आहे. ही बँक प्रशासकाच्या कारकिर्दीत अडचणीत आली. थकित कर्जाचे प्रमाण वाढले. मात्र कोणतेही कर्ज बँकेने विनातारण दिले नव्हते. यामुळे बँक पूर्वपदावर आली. देशात आदर्श बँकांच्या पंक्तीत जिल्हा बँक डौलाने आहे. प्रशासकाच्या काळात बँकेत २१०० कोटी ठेवी होत्या. आज सुमारे ७४५० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. सुमारे ५१०० कोटी रूपयांची कर्जे बँकेने दिली आहेत. या ठेवी १० हजार कोटी करण्याचे धोरण बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ व संचालक मंडळाचे आहे. बँकेचा ढोबळ नफा १८० कोटी रूपये झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

    याप्रसंगी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, भालचंद्र कागले, सुरेश शहापुरे, सुभाषसिंग रजपूत, दत्त साखरचे संचालक रणजीतसिंह कदम, इकबाल बैरागदार, चंद्रकांत जोंग, प्रताप उर्फ बाबा पाटील, संजय नांदणे, मदन मस्के, धनगोंडा पाटील, नंदकुमार पाटील, जयपाल कुंभोजे, बाबासाहेब भोकरे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. जयसिंग खोंद्रे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.