वनविभागात सेवा देणे हे ईश्वरीय कार्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

देशात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये वाघांची संख्या १९० होती, तर ती आता जवळपास ३१२ च्या वर गेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ सभासद देशांपैकी १४ देशात वाघ आहेत.

  • वन अकादमी येथे वन अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप

चंद्रपूर : जल, जंगल, जमीन, वन्यजीव आदींची सेवा आपल्या हातून घडते, ही वन कर्मचाऱ्यांसाठी (For Forest Employees) अभिमानास्पद बाब आहे. वनविभागात सेवा देणे हे ईश्वरीय कार्य आहे (Serving in forest department is a divine duty), असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले.

वन अकादमी (Forest Academy) येथे मानव वन्यजीव संघर्ष (Human Wildlife Conflict) या विषयावर भारतीय वन सेवेच्या देशभरातील अधिकाऱ्यांची तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर वन अकादमीचे संचालक एम.एस.रेड्डी, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर आदी उपस्थित होते.

कन्याकुमारी ते काश्मीर आणि कामरूप ते कच्छपर्यंत पसरलेल्या देशातील भारतीय वनसेवेचे अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित आहेत, याचा वनमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अभिमान वाटतो, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की तीन दिवसात येथे विविध विषयांवर चिंतन, मंथन आणि चर्चा झाली असेल. या कार्यशाळेचा उपयोग आपापल्या राज्यात वन विभागाची सेवा देतांना अधिकाऱ्यांनी करावा.

देशात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये वाघांची संख्या १९० होती, तर ती आता जवळपास ३१२ च्या वर गेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ सभासद देशांपैकी १४ देशात वाघ आहेत. मात्र जगातील सर्वाधिक वाघ माझ्या क्षेत्रात आहे, याचा मला अभिमान आहे, असे ही ते म्हणाले.

मानव – वन्यजीव संघर्षाबाबत सामूहिक चिंतनाची गरज आहे. भारतात प्रत्येक देवी-देवतांसोबत एक वन्यप्राणी आहे. म्हणजेच वन्यजीव हे देवाचे रूप आहे, याची जाणीव ठेवून काम करा. केवळ आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वनविभागाची नोकरी नाही. तर देवाने निर्माण केलेल्या सृष्टीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमाविलेल्या कुटुंबासाठी २० लक्ष रुपयांची तरतूद वनमंत्री म्हणून आपण जाहीर केली आहे. तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनजन योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तेंदुपत्ता बोनसचे ७२ कोटी रुपये वनविभागाने दिले आहे. जेव्हा वन्यप्राण्यांकडून शेतक-यांच्या शेतमालाचे नुकसान होते, तेव्हा मनापासून वाईट वाटते. यावर तोडगा काढण्यासाठी आपले प्रयत्न आहे.

पुढे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान जंगल आणि पर्यावरणाबाबत अतिशय संवेदनशील आहेत. भारतात ७० वर्षात लुप्त झालेले चिते पंतप्रधानांच्या पुढाकाराने नुकतेच आणण्यात आले आहे. वन्यप्राण्यांचे कॉरीडोर तयार करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. विशेष म्हणजे जंगलाचे संरक्षण करणा-या गावक-यांच्यासोबत वन विभागाने उभे राहावे. गावक-यांच्या मनात वन्यप्राण्यांबाबत जी भीती आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न करा. येथे आलेल्या अधिका-यांनी आपापल्या राज्यात चांगले काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तत्पुर्वी भारतीय वन्यजीव संरक्षण संस्था आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे आणि मासिकाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. वन अकादमी येथे देशभरातील भारतीय वन सेवेच्या अधिका-यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात गुजरात, कर्नाटक, ओरीसा, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, केरळ, राज्यस्थान, उत्तराखंड बिहार आदी १३ राज्यातील अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी यांनी तर संचालन अतिरिक्त संचालक (प्रशिक्षण) पियुषा जगताप यांनी केले. कार्यक्रमाला ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक श्वेता बोडू, अपर संचालक (मुख्यालय) प्रशांत खाडे, अपर संचालक (प्रशासन) अविनाश कुमार आदी उपस्थित होते.