पुणे-मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या विस्कळीत

पुणे-मुंबई यादरम्यान (Pune-Mumbai Railway) रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, प्रगती एक्स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्या असून, या गाड्या दादरपर्यंतच धावणार आहेत.

  पुणे : पुणे-मुंबई यादरम्यान (Pune-Mumbai Railway) रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, प्रगती एक्स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्या असून, या गाड्या दादरपर्यंतच धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील क्रमांक 10 आणि 11 या दोन फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी स्थानकावर येणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत.

  साई नगर शिर्डी-मुंबई-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई-हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस, होस्पेट-मुंबई-होस्पेट एक्स्प्रेस, मुंबई-चेन्नई-मुंबई चेन्नई एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या दादरपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यामध्ये पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी गाड्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे ‘एमएसटीधारकांसह सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

  या गाड्या करण्यात आल्या रद्द

  – पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (ता. १ व २ जून)
  – पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (ता. १ व २ जून)
  – कुर्ला-मडगांव-कुर्ला (ता. १ व २ जून)
  – पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस (ता. २८मे ते २ जून)
  – पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (ता. ३१ मे ते २ जून)