जत तालुक्यात भीषण दुष्काळचं संकट! तब्बल ३१ गावांना टँकरने पाणीपुरवठा

कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यात ३० टँकरने ३१ गावांतील ९ हजार १६९ लोकांना पाणी पुरवठा सुरू आहे, तर तालुक्यात १८ तलाव कोरडे पडले आहेत. भूजल पातळीही तीन मीटरने घटली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

    जत : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यात ३० टँकरने ३१ गावांतील ९ हजार १६९ लोकांना पाणी पुरवठा सुरू आहे, तर तालुक्यात १८ तलाव कोरडे पडले आहेत. भूजल पातळीही तीन मीटरने घटली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

    अवर्षणप्रवण म्हणून जत तालुका ओळखला जातो. तालुक्यात अवकाळी व मान्सूनच्या पावसाने दडी मारली आहे. यंदा एक महिना उशिराने पावसाला सुरूवात झाली. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस पडला. गेल्या पाच वर्षातील नीच्चांकी पाऊस झाला आहे. यावर्षी ३२९.२ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी तालुक्यात ११५.१३ टक्के पाऊस झाला होता. यंदा ७५.६ टक्के म्हणजे ४० टक्के कमी पाऊस झाला आहे.

    मुसळधार व भीज पाऊस झाला नसल्याने जमिनीतील पाणीपातळी वाढली नाही. परिणामी, विहिरी व कूपनलिका कोरड्या आहेत. खरीप हंगाम वाया गेला आहे. मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने खुरट्या गवताची उगवण झाली नाही. परिणामी पशुधन संकटात सापडले आहे. पाणी पातळी ६०० ते ७०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. २८ तलावांपैकी १३ तलाव कोरडे, तर १२ तलावांतील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे.

    नळपाणी पुरवठा योजनांच्या विंधन विहिरी, परिसरातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. भूजल पातळी तीन मीटरने घटली आहे. विहिरी, तलाव, बंधारेंना पाणी नाही. विहिरी, तलाव, कुपनलिका, बंधारे कोरडे पडले आहेत. सध्या ३ टक्के पाणीसाठा आहे. सध्या ५३ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरने ३१ गावे, २५५ वाड्या-वस्तींना ५ शासकीय टँकरनी व २६ खासगी टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. ७२ मंजूर खेपा आहेत, प्रत्यक्षात ६९ खेपा होत आहेत.

    तालुक्यातील वळसंग, शेड्याळ, निगडी बुद्रुक, मोकाशेवाडी, वायपळ, पांढरेवाडी, हळ्ळी, तिकोंडी, सालेगिरी पाच्छापूर, गुगवाड, बेळोंडगी, सोन्याळ, गिरगाव, जाडरबोबलाद, संख, दरीबडची, कागनरी, जालिहाळ खुर्द, कोळगिरी, तिकोंडी, बेळोंडगी, टोणेवाडी, माडग्याळ, सोनलगी, मुचंडी येथे टँकर सुरू आहे. सिद्धनाथ, गुलगुंजनाळ, संख वाडी वस्ती, व्हसपेट, करेवाडी (कोबो), दरीकोणूर या गावांतील टँकर मागणी प्रस्ताव संभाव्य यादीत प्रलंबित आहेत.

    रब्बी हंगाम धोक्यात, चाऱ्याचा प्रश्न गंभीर

    शेतीच्या सिंचनासाठी तालुक्यात यंदा प्रथमच जुलैमध्ये म्हैसाळचे पाणी सोडावे लागले आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. रानावनातील पाणीसाठे कोरडे पडल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे.