indrayani river polluted

उगमापासून नदीपात्र स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न, आता नाल्यांचे पाणी होणार शुध्द

  पिंपरी : पवना व इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. इंद्रायणी नदीच्या काठावर लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, देहू नगरपंचायत, वडगाव नगरपंचायत, देहू कटक मंडळ, कुसगाव बुद्रुक, कामशेत-खडकाळे, इंदुरी ही १५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्येची गावे, कार्ला, वरसोली, कान्हेवाडी तर्फे चाकण, येलवडी, आंबी, जांभूळ, कान्हे, गोळेगाव, सोळू, तुळापुर, मरकळ, नाणे, टाकवे बुद्रुक, सांगुर्डी, वडगाव शिंदे या १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांत एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत. उर्वरित २४ गावांमध्ये इन सेतू नाला ट्रीटमेंटचा वापर करून मैला शुद्धीकरण करण्याचे काम केले जाणार आहे.

  कार्तिकी यात्रेपूर्वी फेसाळलेल्या इंद्रायणीचे प्रदूषित रुप पाहून भाविक व नागरिक कमालीचे संतप्त झाले. या घटनेमुळे झालेल्या चौफेर टिकेमुळे प्रशासन खडबडून जागे झाले. अनेक वर्षे बसनात अडलेल्या नदी सुधार योजना प्रकल्प पुन्हा चर्चेत आले. त्यानंतर पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

  या बैठकीसाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, महापालिका आणि पीएमआरडीएचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. अमृत योजनेअंतर्गत याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा ५७७.१६ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल ऑगस्ट २०२३ मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला. राज्याने याला मान्यता दिली असून आता हा अहवाल केंद्राच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे (एनआरसीडी) सादर करण्यात आला आहे.

  एनआरसीडीकडून ६० टक्के अनुदान आणि राज्य शासन ४० टक्के अनुदान देणार आहे. इंद्रायणी नदीच्या तीरावर एकूण ४८ गावांमधील पाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्याबाबत नियोजन केले जात आहे. यामध्ये लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी नगरपरिषदा, वडगाव, देहू नगरपंचायती, देहू कटक मंडळ, १५ हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या तीन ग्रामपंचायती आणि इतर ३९ ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे. पवना नदीच्या किनारी देखील ज्या ग्रामपंचायतींचे पाणी पवना नदीत मिसळत आहे, तिथे एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत.

  ज्या नगरपालिकांचे आणि गावांचे पाणी नदीत मिसळत आहे, त्या गावांमध्ये पूर्ण क्षमतेने एसटीपी उभारण्यात येणार आहेत. यामुळे नदीन मिसळणारे सांडपाणी प्रक्रिया होऊनच नदीत सोडले जाईल. याचा राज्य शासनाकडून केंद्राकडे प्रस्ताव गेला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या सहकार्याने पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.

  -श्रीरंग बारणे, खासदार, मावळ