लोणीकंदच्या हद्दीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, बांगलादेशी तरुणीसह ६ जणींची सुटका; दोन मॅनेजरला अटक

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजिंग व हॉटेलात सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी करून पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी २० वर्षांच्या बांगलादेशी तरुणींसह एकूण ६ जणींची सुटका केली आहे. तर, दोघा मॅनेजरला अटक केली आहे.

    पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजिंग व हॉटेलात सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी करून पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी २० वर्षांच्या बांगलादेशी तरुणींसह एकूण ६ जणींची सुटका केली आहे. तर, दोघा मॅनेजरला अटक केली आहे. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.

    प्रज्योत हिरीआण्णा हेगडे (वय २७, रा. पेरणे फाटा) आणि गिरीश शाम शेट्टी (वय २९, रा. पेरणे फाटा) अशी अटक केलेल्या मॅनेजरांची नावे आहेत. हा प्रकार लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे सुरु होता. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील रेश्मा कंक यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, पोलिस हवालदार अजय राणे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, पोलिस अंमलदार सागर केकाण, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, अमित जमदाडे, संदीप कोळगे, किशार भुजबळ, ओंकार कुंभार, इरफान पठाण आणि महिला पोलिस रेश्मा कंक यांच्या पथकाने केली आहे.

    पोलीस आयुक्त रितेश कुमार तसेच सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु तरीही छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरूच आहेत. यादरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल मनोरा लॉजिंग व बोर्डिंग अँड रेस्टॉरंट येथे वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर येथे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव व त्यांच्या पथकाने छापा टाकला. त्यात हॉटेलमध्ये ६ तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले.

    मॅनेजर ग्राहकाकडून दीड हजार रुपये घेत असत. त्यातील एक हजार रुपये दोघे वाटून घेऊन तरुणींना पाचशे रुपये देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांना दोघा मॅनेजरांना अटक केली. येथून २० ते २८ वयोगटातील बांगलादेशी तरुणींसह हिंजवडी, कोलकत्ता येथील एकूण ६ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.