रिक्षाचे डिस्क टायर चोरणाऱ्यांना बेड्या; चोरट्यांकडून 10 डिक्स टायरसह रिक्षा जप्त

पार्क केलेल्या रिक्षा शोधून त्या रिक्षांचे फक्त डिस्क टायर चोरणाऱ्या दोन चोरट्यांना मुंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दहा डिस्क डायर, एक स्टीलचे टायर व रिक्षा जप्त करण्यात आला आहे.

    पुणे : पार्क केलेल्या रिक्षा शोधून त्या रिक्षांचे फक्त डिस्क टायर चोरणाऱ्या दोन चोरट्यांना मुंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दहा डिस्क डायर, एक स्टीलचे टायर व रिक्षा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केवळ २४ तासात चोरट्यांचा शोध लावत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

    ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष जगताप व पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे व त्यांच्या पथकाने केली आहे. वाजिद युनूस अन्सारी (वय २२, रा. हडपसर) व झैद जविद शेख (वय २२, रा. काळेपडळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

    पुणे शहरात वाहन चोरीच्या घटनांत दरवर्षी वाढ होत आहे. वाहन चोरीसोबत वाहनांचे महागडे पार्ट चोरणारी टोळी देखील सक्रिय असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुंढवा परिसरातून गेल्या काही दिवसात सहा रिक्षांचे दहा डिक्स टायर चोरून नेल्याची घटना घडली होती. याघटनेची मुंढवा पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती.

    तत्पुर्वी मुंढवा येथील भिमनगर येथे ही घटना घडली होती. हा परिसर दाटीवाटी असणारा आहे. येथे मोलमजूरी करून राहणारा वर्ग आहे. त्याच ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी चोरट्यांचा माग काढण्याची सूचना केली होती.

    यादरम्यान, तपास करत असताना पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हडपसर-मुंढवा रोडवरील ब्रिजखाली येणार असल्याचे समजले. त्यानूसार, पथकाने याठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबूली दिली. चोरट्यांकडून चोरीचे १० डिस्क टायर, एक स्टीलचे टायर व रिक्षा जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.