खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या चौघांना बेड्या; कोंढवा पोलिसांच्या पथकाची कारवाई

कोंढव्यात खुनी हल्ला करून पळून गेलेल्या चौघांना अहमदनगर येथील अकोले तालुक्यातील बेलापूर येथून कोंढवा पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

    पुणे : कोंढव्यात खुनी हल्ला करून पळून गेलेल्या चौघांना अहमदनगर येथील अकोले तालुक्यातील बेलापूर येथून कोंढवा पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. शेतात झाडावर मचान बांधुन चौघेजण लपून बसले होते. तर, त्यांच्या चौकशीत आणखी एकाचे नाव समोर आल्यानंतर त्यालाही बेड्या ठोकलण्यात आल्या आहेत.

    ही कारवाई उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक दिनेशकुमार पाटील, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, लवेश शिंदे, अमंलदार शाहीद शेख, लक्ष्मण होळकर , संतोष बनसुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    शेहबाज मोद्दीन खान (३०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), बालाजी मिन्ना मंगाली (३५, येवलेवाडी), सुरज राजेंद्र सरतापे (२५, रा. चिमटावस्ती, फातिमानगर), जुबरे कद्दुस कुरेशी (३५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चौघांच्या चौकशीत रॉकी ईर्दी अ‍ॅन्थोनी (३१, रा. वानवडी बाजार) याला अटक करण्यात आली.

    कोंढव्यातील समतानगर येथे १४ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून सनी चव्हाण आणि अनशि चव्हाण हे झेनुद्दीन शेख उर्फ कललू याला मारण्यासाठी अंगावर धावून गेले. त्यावेळी ही भांडणे सोडविण्यास तक्रारदार यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी तक्रारदारांच्या ओळखीचा शेहबाज शेख व इतरांनी कल्लूच्या डोक्यात व हातावर धारदार हत्यारांनी वार केले होते. यावेळी तक्रारदार व कासीम सय्यद हे कल्लू याला वाचविण्यासाठी मध्ये पडले असता सनी चव्हाण अनिस चव्हाण यांनी त्यांना लाथा बुकंनी मारहाण केली होती. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पसार झाले होते.

    गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी हे अहमदनगर येथील बेलापूर येथील आरोपी शेहबाज शेख याच्या शेतातील झाडावर मचान करून राहत असल्याची खबर पोलिस हवालदार सतिश चव्हाण व पोलिस हवालदार विशाल मेमाणे यांना मिळाली त्यानंतर चार जणांना मचानात लपून बसल्यानंतर सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबूली दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.