
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (बापू) यांनी अनेक पक्ष बदलले. येत्या निवडणुकीत आमदार पाटील यांची विकेट नक्की पडणार आहे. त्यांना एवढे ही टेन्शन देणार नाही की, त्यांचा सर्व स्टॉक थर्टी फर्स्टच्या आधीच संपून जाईल. कारण त्या दिवशी ड्राय डे असतो, अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबाेल केला.
सांगोला : सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (बापू) यांनी अनेक पक्ष बदलले. येत्या निवडणुकीत आमदार पाटील यांची विकेट नक्की पडणार आहे. त्यांना एवढे ही टेन्शन देणार नाही की, त्यांचा सर्व स्टॉक थर्टी फर्स्टच्या आधीच संपून जाईल. कारण त्या दिवशी ड्राय डे असतो, अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबाेल केला. सांगोला येथे आयाेजीत जाहीर सभेत त्या बाेलत हाेत्या. या सभेत अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजप नेते आशिष शेलार, इंदुरीकर महाराज यांच्यावर सडकून टिका केली.
अंधारे म्हणाल्या, शेकापचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे सांगोला तालुक्यावर अनंत उपकार आहेत. तब्बल अकरा वेळा आमदार होऊनही त्यांनी इस्टेट तयार केली नाही. तालुक्यातील दुष्काळ हटवण्याचे मोठ कार्य देशमुख यांनी केले. स्वतःच्या पत्नीला दोनशे रुपयाची साडी न घेऊ शकणारे शहाजी पाटील आमदार बनल्यानंतर दोन वर्षातच एक एकर जागेत बंगला बांधत आहेत, ही आश्चर्याची बाब आहे संभाजी भिडे यांनी वारकरी परंपरेवर कठोर टीका करत खिल्ली उडविली आहे. त्यावर भाजप नेते कधी बोलणार ? आशिष शेलार माझा राजीनामा मागत आहेत. मी काय कॅबिनेट मंत्री आहे का? असा सवाल अंधारे यांनी केला.
भाजपच शिंदेंचे राजकारण संपवेल
भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला आहे. ते आता मुख्यमंत्र्यांना विविध प्रकरणात अडकवून संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. भूखंड घोटाळ्याचा प्रश्न भाजप आमदारांनी उपस्थित केला होता. त्यामुळे भाजपच एकनाथ शिंदे यांना पदावरून पाय उतार करेल, असे अंधारे म्हणाल्या.
शहाजी पाटील पहिली उडी मारतील
उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळण्याचा भाजपचा हेतू आता सफल झाल्याने त्यांना शिंदे गटाची गरज उरलेली नाही. शिंदे गटातील किमान वीसहून अधिक आमदार फुटून भाजपमध्ये जाऊ शकतात. असे झाले तर भाजपमध्ये उडी मारणारे पहिले आमदार शहाजी पाटील असतील, असा दावा अंधारे यांनी केला आहे
मित्राला न सांगता पाटील गुपचूप गुवाहाटीला
शहाजी पाटील यांचे मित्र तथा माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांनाही अंधारे यांनी लक्ष्य केले. रफिक नदाफ अामदार शहाजी पाटील यांच्या जवळचे मित्र असूनही आमदार पाटील त्यांना न सांगता गुवाहाटीला गुपचूप गेले. सांगोल्यात टक्केवारीचे राजकारण चालते, असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला.