कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी; महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा सोडल्यानंतर त्यांची ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

    कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा सोडल्यानंतर त्यांची ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने महायुतीतील त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ गत निवडणुकीत शिवसेनेने जिंकला होता. विद्यमान खासदार शिंदे गटात गेल्याने या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला होता, तर काँग्रेस पक्षाने ही या मतदार संघावर हक्क सांगितला होता. मात्र शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाने एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेत हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेऊन निवडणूक लढवण्यासाठी गळ घातली होती. त्याचवेळी उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून शाहू महाराज छत्रपती यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने आता प्रचाराची व्याप्ती आणखी वाढणार आहे. सध्या महायुतीकडून उमेदवार कोण असणार याबाबत संभ्रम निर्माण असला, तरी प्रमुख दावेदार म्हणून संजय मंडलिक यांचे नाव समोर येत आहे.

    हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी ?

    कोल्हापूरची लढत ही व्यक्तिगत नसून ती वैचारिक आहे. हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी अशी ही लढत होणार असून त्याचा संदेश राज्यभर जाणार आहे. म्हणूनच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर राज्यसह देशाचे लक्ष राहणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव पुढे आले.