‘नातवाला राजकारणात ओढाल तर…’, सुषमा अंधारेंना शालिनी ठाकरेंचं प्रत्युत्तर

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना इशारा दिला आहे.

    मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली. यात त्यांनी राज ठाकरे यांचा नातू किआन याचाही उल्लेख केला. यावरून मनसैनिक आक्रमक झाले आहेत. अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राजसाहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात. तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही, असं ट्विट करत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी सुषमा अंधारे यांना इशारा दिला आहे.


    एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली. त्याचा आपल्या नातवाला त्रास झाला. त्यामुळे हा नेता भाष्य करेल. नेत्यांच्या नातवाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मात्र गोरगरिबांचं काय? नुसतं दुपारी उठून कसं चालेल, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. त्याला आता मनसेकडून उत्तर देण्यात आलं आहे.  राज साहेबांच्या नातवाला राजकारणात संबंध नसताना आणण्याची काय गरज होती? हा माझा विषय होता, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसं पत्रही शालिनी ठाकरे यांनी लिहिलं आहे.

    शालिनी ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र

    प्रति,

    सुषमा अंधारे

    विषय – या पुढे संबंध नसताना राजसाहेब यांच्या नातवाला राजकारणात ओढाल, तर कानाजवळ डी. जे. वाजवू

    प्रिय, अंधारे बाई,

    हिंदू सण उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत यासाठी राजसाहेबांनी अनेकदा ठाम भूमिका घेतली आहे. मात्र काही हिंदू सणांमध्ये डी. जे. आणि लेझर लाईट मुळे होणारा त्रास याबाबत ही रोखठोक भूमिका घेवून त्यास विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेने तसेच सर्व पक्षातील संवेदनशील माणसांनी याचे स्वागत केले. हीच बाब बहुदा तुम्हाला रुचली नसल्याचे दिसतय.

    सध्या मराठीबाबत तांडव सुरू असताना तुमचे शिल्लक सेना प्रमुख आणि त्यांचे बगल बच्चे शांतच आहेत. अशा वेळी फक्त मनसे आणि राजसाहेब सडेतोड भूमिका घेताना दिसत आहेत. म्हणुनच राजसाहेबांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न कर आहात.

    कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या ‘गट’ प्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी तुमच्या ‘गट’ प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते. मग तुमच्या सारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते.

    शिल्लक सेना प्रमुख आज काल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत, म्हणुन आपण नैराश्येत आहात. त्यातूनच संबंध नसताना आपण राजसाहेबांच्या नातवाला या राजकारणात ओढले. हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. या बाबत आपण खरंतर जाहीर माफी मागितली पाहिजे. पण आमच्या देव देवतांचा, आमच्या संतांचा अपमान करणाऱ्या तुम्ही. त्यामुळे आम्ही आपल्याकडून ही सुसंस्कृत अपेक्षा करणेच चूक आहे.

    आपल्याला ही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी विधाने केली, तर ती तुमच्या मनाला रुचतील का ?

    अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही.

    ज्या बाबी पटत नसतील त्याला विरोध जरूर करा. मात्र विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा.

    आपली नम्र
    शालिनी ठाकरे

    ——
    दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यावरही शालिनी ठाकरे यांनी भाष्य केलं. मला उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे येत आहे. याबाबत राज साहेबांसोबत चर्चा झालेली नाही,असं सांगण्यात आलं.