महायुतीला घरचा आहे; शिंदे गटाच्या दोन संभाव्य उमेदवारांना मनसेचा नकार

यासाठी रवींद्र वायकर आणि संजय निरुपम हे उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मनसेने या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

    मुंबई – लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यामध्ये महायुतीमध्ये राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. नरेंद्र मोदी यांचे कार्य पाहून हा पाठिंबा दिला असल्याचे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये जाहीर केले. राज ठाकरेंना सोबत घेत राजकीय वर्तुळामध्ये महायुतीने आपली ताकद दाखवून दिली. मात्र मनसेला शिंदे गटाच्या दोन संभाव्य उमेदवारांबाबत नाराजी असल्याचे समोर आले आहे. निवडणूका जवळ आल्या तरी देखील शिंदे गटाकडे असणाऱ्या मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघासाठी उमेदवार मिळालेला नाही. यासाठी रवींद्र वायकर आणि संजय निरुपम हे उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मनसेने या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

    शिंदे गट हा आमदार रवींद्र वायकर यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. तसेच वायकरांनी देखील मतदारसंघात प्रचाराची जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलेले संजय निरुपम लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपा आणि शिंदे गटाकडे प्रयत्न करत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने या दोन्ही नेत्यांवर आक्षेप घेतला आहे. तसेच निवडणुकीत यांना तिकीट मिळालं तर मनसेचा यांना पाठिंबा नसेल, असं जाहीर केलं आहे. याबाबत शालिनी ठाकरे यांनी पोस्ट देखील केली आहे.

    शालिनी ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनसेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढायला सांगणार्‍यांवर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा, राज ठाकरे यांनी केवळ देशाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकरांसारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहित धरू नये. अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांच्या मनसेने घेतली आहे.