शंभूराज देसाई यांनी केली संजय राठोडांची पाठराखण, म्हणाले…

संजय राठोड यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात समावेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे सहकारी मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे.

    महाबळेश्वर : आरोप होत असलेले आ. संजय राठोड यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात समावेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे सहकारी मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणाशी राठोड यांचा काडीचाही संबंध नसल्याचे सिध्द झाल्याने आता त्यांच्यावर नाहक आरोप करणे हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी दिली.

    गेली दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या दौऱ्यात मंत्री शंभूराज देसाई हे देखील सहभागी झाले होते, गुरूवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मुळगावी दरे येथे रवाना झाले तेंव्हा देसाई हे महाबळेश्वर येथील शासकिय विश्रामगृहावर थांबले होते. आज शुक्रवारी आपला दौरा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावावरून निघाले, तेंव्हा त्यांच्या स्वगतासाठी ते येथील छ शिवजी महाराज चौकात थांबले होते, तेव्हा पत्रकारांशी ते बोलत होते.

    संजय राठोड यांच्यावरील आरोपाबाबत बोलताना देसाई म्हणाले की, मविआमध्ये असताना संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते, आरोप झाल्या झाल्या त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते पायउतार झाले होते, आयपीएस दर्जाच्या अधिकारी पुणे आयुक्तांनी या प्रकरणाची संपुर्ण चौकशी केली. यामध्ये त्यांना क्लिनचीट मिळाली. राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असा अहवाल पोलिस विभागाने गृह विभागाला दिला. राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपामध्ये तथ्य नाही या प्रकरणाशी त्यांचा संबंध नाही, हे उच्चस्तरीय चौकशीत सिध्द झाले आहे. त्यामुळे आता राठोड यांच्यावर नाहक आरोप करणे योग्य नाही, अशा शब्दात मंत्री देसाई यांनी संजय राठोड यांच्या वरील आरोपांची पाठराखण केली.

    पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना देसाई म्हणाले की, न्यायालयाकडून या प्रकरणाच्या निकालास विलंब होत आहे, अशा प्रकारचे आरोप कोणी करीत नाही. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. सध्या शिंदे गटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी आमची बाजू आम्ही न्यायालयासमोर भक्कमपणे मांडली आहे. आमची बाजू मजबुत आहे. या प्रकरणाच्या सर्व बाजू तपासल्या जातील. या प्रकरणाची सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शिंदे गटाला निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास मंत्री शंभुराज देसाई यांनी महाबळेश्वर येथे बोलताना व्यक्त केला