क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित यांच्या पत्नी शांताताई पुरोहित यांचे निधन

महाड येथील किसान मोर्चाचे प्रमुख, स्वातंत्र्यसेनानी, क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित यांच्या पत्नी श्रीमती शांताताई पुरोहित यांचे आज अलिबाग येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९४ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई असा परिवार आहे.

    महाड: क्रांतीवीर स्व. नानासाहेब पुरोहित यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. १० सप्टेबर १९४२ रोजी स्व. नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली महाड तहसिल कार्यालयातर किसान मोर्चा काढण्यात आला होता. त्यात पाच देशक्तांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्या आधीही भूमीगत राहून स्व. नानासाहेब पुरोहित स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. या सर्व काळात शांताताई पुरोहित या स्व. नानासाहेब पुरोहित यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या होत्या.

    शांताबाई पुरोहीत यांचा जन्म महाड येथील शेट या सुखवस्तू कुटूंबात झाला. बालपण व शिक्षण देखील त्यांचे महाड येथेच झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्व. नानासाहेब पुरोहित यांच्या बरोबर त्यांचा प्रेमविवाह झाल्याची आठवण त्यांच्या कन्या अर्पीता अरविंद रानडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली. शांताबाई यांच्या वडिलांचा त्याकाळी महा द मध्ये बेकरी व्यवसाय होता आणि ते देखील स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी होते.

    त्यांच्या वडिलांनी देखील 1942 मध्ये कारावास भोगला होता. स्वातंत्र्य प्राप्तीचा ध्यास घेतलेल्या शेट कुटूंबात त्यांचा जन्म झाल्याने शांताबाई देखील स्वातंत्र प्राप्तीसाठी आपल्याकडून शक्य तितके योगदान सातत्याने देत असत. त्याकाळात महाड व परिसरात वैद्यकीय सूविधा विकसित झाल्या नव्हत्या. परिणामी शांताबाई या महाड परिसरातील गरोदर महिलांची प्रसूती त्यांच्या घरी जाऊन करुन देत असत. त्यांनी आपल्या उमेदिच्या काळात 20 हजार पेक्षा अधिक महिलांच्या घरी रात्री अपरात्री जाऊन प्रसुती करुन देण्याचे अनन्यसाधारण काम केले असल्याची आठवण देखील त्यांच्या कन्या अर्पीता रानडे यांनी सांगितली.

    शांताताई पुरोहित यांच्या निधनाचे वृत्त आज महाडमध्ये आल्यानंतर महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, स्वातंत्र्य सैनिक समितीचे श्रीकृष्ण बाळ, नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी शोक व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.