Sharad Mohol murder case,
Sharad Mohol murder case

  पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खूनासंदंर्भात पुणे पोलिसांच्या हाती तब्बल २० हजार रेकॉर्डिंग सापडले असून, त्याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. रेकॉर्डिंगमधून काही महत्वाची माहिती उघड झाली असून, ६ रेकॉर्डिंग खूनासंदंर्भात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासोबतच मुख्य आरोपींच्या संपर्कात असलेल्या एकाला देखील अटक करण्यात आली आहे.

  शरद मोहोळ खूनप्रकरणातील ही १६ वी अटक

  अभिजित अरुण मानकर (वय-३१, रा. दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणातून अभिजित मानकर हा आरोपींच्या संपर्कात असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला मंगळवारी अटक केली आहे. शरद मोहोळ खूनप्रकरणातील ही १६ वी अटक आहे.

  गुन्हे शाखेकडून तपास सुरू

  गँगस्टर शरद मोहोळचा ५ जानेवारी रोजी सुतारदरा परिसरात त्याच्याच घरासमोर गँगमधील साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. दरम्यान, या आरोपींना २४ तासाच्या आत पकडण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांना मोबाईलही हाती लागले होते. मोबाईलची पडताळणी केली असता काही आरोपींच्या मोबाईलमधील तब्बल १९ हजार ८२७ ऑडिओ क्लिप (रेकॉर्डिंग) मिळवून आले आहे. यातील १० हजार रेकॉर्डिंगचे तांत्रिक विश्लेषण केले.

  अभिजित मानकरला न्यायालयात हजर

  यातील ६ क्लिप शरद मोहोळ खून प्रकरणाशी संदर्भात आहेत. यातील ६ क्लिप मध्ये अनेक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यासोबतच शरद मोहोळला गोळ्या घालणारे मुन्ना पोळेकर व नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात अभिजित मानकर होता. त्याच्याकडे ८ दिवशी चौकशी केल्यानंतर त्याला गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली आहे. बुधवारी अभिजित मानकरला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  ९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

  शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेल्या विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके,विनायक  गव्हाणकर, विठ्ठल गांदले आणि गणेश मारणे हे ९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या आरोपींकडे एकत्रित चौकशी सुरू करण्यात आली आहे.