शरद मोहोळच्या साथीदाराने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

गँगस्टर शरद मोहोळचा जवळचा साथीदार हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसानिमित्ताने भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्याचे समोर आले आहे.

    पुणे : गुन्हेगार अन् राजकीय पक्ष त्यासोबतच त्या-त्या पक्षातील नेत्यांचे असणारे संबंध दिवसेंदिवस वाढत असतानाच ते उघड देखील होऊ लागले आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ यांनी गुंड गजानन मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर आता गँगस्टर शरद मोहोळचा जवळचा साथीदार हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसानिमित्ताने भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्याचे समोर आले आहे.

    या भेटीचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुण्यातील निलायम चित्रपटागृहाजवळील एका हॉटेलमध्ये टोळीयुद्धातून शरद मोहोळ, हेमंत दाभेकर व साथीदारांनी गुंड गणेश मारणे याच्या टोळीतील किशोर मारणेचा खून केला होता. याप्रकरणात न्यायालयाने मोहोळ, दाभेकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर खून प्रकरणात त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

    दरम्यान, गेल्या महिन्यात ५ जानेवारीला शरद मोहोळ याचा कोथरूडमध्ये टोळी युद्धातूनच खून झाला आहे. त्याचा मास्टर माईंड देखील गणेश मारणे व विठ्ठल शेलार हे असल्याचे समोर आले आहे.

    तत्पूर्वी शरद मोहोळची पत्नी स्वाती यांनी काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. यानंतर शरद मोहोळच्या खुनानंतर त्याचा जवळचा साथीदार मानला जाणाऱ्या हेमंत दाभेकरने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वाढदिवदिवसानिमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्याचे समोर आले. मुंबई निवासस्थानी वर्षा बंगल्यावर डॉ. शिंदे यांची ही भेट घेण्यात आली.

    गुंड गजानन मारणेची पत्नी जयश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलला आहे. दुसरीकडे मोहोळच्या पत्नीने भारतीय जनता पक्षाचे काम कोथरुड भागात सुरू केले. पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली. या भेटीवरुन अजित पवार यांनी जाहीरपणे पार्थ यांना खडे बोल सुनावले होते. त्यापाठोपाठ आता दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन खासदार शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

    भेट घडवून आणणाऱ्याची हकालपट्टी

    दाभेकरविरुद्ध खून, खंडणी, अपहरण असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आता याची गंभीर दखल घेत दाभेकरची शिंदे यांच्याशी भेट घडविणाऱ्या युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी अनिकेत जावळकर यांची हक्कालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत.