बारामतीत शरद पवार गट बांधणीसाठी सक्रीय; राष्ट्रवादीच्या युवक शहराध्यक्षपदी सत्यव्रत काळे यांची निवड

: बारामती शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राजकीय मोर्चेबांधणीसाठी सक्रिय झाला असून, राष्ट्रवादी युवकच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक व बारामती नगरपालिकेचे बांधकाम समिती चे माजी सभापती सत्यव्रत अर्जुन काळे यांची निवड करण्यात आली आहे.

    बारामती : बारामती शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राजकीय मोर्चेबांधणीसाठी सक्रिय झाला असून, राष्ट्रवादी युवकच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक व बारामती नगरपालिकेचे बांधकाम समिती चे माजी सभापती सत्यव्रत अर्जुन काळे यांची निवड करण्यात आली असून, शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी प्रियांका नितिन खारतोडे यांची निवड करण्यात आली असून, या निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले आहे.
    राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षपदी ॲड एस. एन. जगताप तर शहराध्यक्षपदी ॲड संदीप गुजर यांची निवड करून हा गट शहर व तालुक्यात सक्रिय झाला होता. यानंतर राष्ट्रवादी युवकच्या शहराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे युवकच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सत्यव्रत अर्जुन काळे यांची युवक शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. सत्यव्रत काळे यांनी बारामती नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम केले आहे, यादरम्यान  बारामती नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
    सत्यवत काळे व प्रियांका खारतोडे यांना निवडीचे पत्र शरद पवार यांनी दिल्यानंतर त्यांना जोमाने चांगले काम करण्याची सूचना दिली. यावेळी ॲड एस एन जगताप, ॲड संदीप गुजर उपस्थित होते. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून शहरांमध्ये पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे करणार असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम केले जाईल, असे सत्यव्रत काळे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.