सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर; ‘या’ कार्यक्रमासाठी एकत्र

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

    पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

    राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये दोनदा भेट झाली आहे. एमसीएच्या निवडणूक काळात आणि नंतर शरद पवार यांच्यावर शस्रक्रिया झाली त्यावेळी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दोघांची भेट झाली होती. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने काय बोलणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. याच कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमात काय घडामोडी घडतात शिंदे-पवार काय बोलतात याचीच राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

    विविध पुरस्कारांचं वितरण केलं जाणार

    वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज मांजरी इथं पार पडणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत. दरवर्षी या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित ही सभा पार पडत असते. राज्याचे मुख्यमंत्री देखील या सभेला येत असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे आज या सभेला हजेरी लावणार आहेत. यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. राज्याच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते. या संस्थेमार्फत ऊसाच्या संदर्भात विविध संशोधन, मार्गदर्शन केलं जातं. आजच्या या सभेसाठी सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याच्या साखर उद्योगातील अन्य नेते देखील हजेरी लावणार आहेत.

    वसंतदादा पाटील यांनी केली होती स्थापना

    वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत शास्त्रीय, तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधन करण्याकरता स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना 19 नोव्हेंबर 1975 रोजी दिवंगत वसंतदादा पाटील यांनी केली आहे. 1956-57 मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांनी स्वतः शेतामध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह वसंतदादांनी धरला होता.

    शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करुन संशोधनाला चालना

    तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग आणि मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. वसंतदादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करुन संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे.

    याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत स्तुतीसुमणं उधळली आहे. ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते असे जेष्ठ नेते शरद पवार असा उल्लेख करून जयंत पाटील यांना टोला लगावला आहे. यावेळी जयंत पाटील यांच्याही तोंडात साखर असते असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले, ऊस शेती, साखर उद्योगासाठी समर्पित असणारी देशातील एकमेव संस्था असणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे. ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते शरद पवार, जयंत पाटील यांच्याही तोंडात साखर असते, अधिवेशनात जयंत पाटलांची आठवण काढून मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे.

    मी देखील दावोसला जाऊन आलो आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक आली आहे, कुणीही काही म्हणू देत, पवार साहेब नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांचे योगदान खूप मोठे आहे. राज्याला मदत होण्यासाठी शरद पवार सूचना करत असतात, मार्गदर्शन करत असतात, सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान नाकारता येणार नाही, आज ज्यांचा सम्मान होणार आहे, त्यांच्यामुळे साखरेचे साम्राज्य उभं राहणार आहे.