“मोदी संसदेत क्वचितच येतात. पण जेव्हा येतात तेव्हा….”, शिर्डीतील सभेतून शरद पवारांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

  Sharad Pawar on PM Modi : शरद पवार म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगताहेत की ‘मोदी की गॅरंटी’ आहे. पण ती काही खरी नाही. त्यांनी ‘मोदी की गॅरंटी है’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात केलेल्या भाषणातून लोकसभा निवडणुकांचे बिगुल फुंकले. त्यामुळे आता देशभरात भाजपच्या स्थानिक व राष्ट्रीय नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘मोदी की गॅरंटी’ म्हणत प्रचार केला जात आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टिप्पणी केली आहे. त्यांच्या धोरण मांडणीवर शरद पवारांनी हल्लाबोल केला. शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिरातून त्यांनी भाजपावर टीकास्र सोडलं.

  नेमकं काय म्हणाले शरद पवार

  शरद पवारांनी यावेळी भाजपचे धोरण फसवे असल्याची टीका केली. देशात आज अस्वस्थता आहे. भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे. आक्रमक प्रचारयंत्रणा त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केली आहे. त्यातून जसे हिटलरच्या जर्मनीतील गोबेल्स नीतीची चर्चा होते, त्याचप्रमाणेत असत्यावर आधारित अनेक गोष्टी जनमानसात पसरवण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत”, असे शरद पवार म्हणाले.

  केरळमध्ये आज कम्युनिस्ट व काँग्रेसचे राज्य

  “सध्या देशातले चित्र भाजपाला अनुकूल नाही. त्यामुळे केरळमध्ये आज कम्युनिस्ट व काँग्रेसचे राज्य आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये भाजप नाही. काही ठिकाणी भाजप आहे पण स्वत:च्या ताकदीवर नाही. गोव्यात आमदार फोडून तिथे भाजपा सत्तेत आली. तीन राज्यांच्या निवडणुका होण्याआधी मध्य प्रदेशमध्ये आमदार फोडून तिथे भाजपने सत्ता मिळवली. त्यामुळे भाजपला देशात अनुकूल असे वातावरण नाही. अनेक कार्यक्रम जाहीर करून त्याची अंमलबजावणीच न करून लोकांची फसवणूक करण्याचे काम भाजपने केले आहे”, अशी टीका शरद पवारांनी यावेळी केली.

  “मोदी संसदेत क्वचित येतात, पण जेव्हा…”
  दरम्यान, यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्र सोडले. “मोदी संसदेत क्वचितच येतात. पण जेव्हा येतात तेव्हा एखाद्या धोरणाची मांडणी अशी करतात की संसदेतले सदस्यही काही वेळासाठी थक्क होतात. घोषणा खूप करतात. २०१६-१७ या काळातला अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला. त्यात सांगितलं की २०२२ पर्यंत देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल. आता २०२४ आलंय. पण काहीच घडलं नाही. एकदा मोदींनी संसदेत सांगितलं की २०२२ पर्यंत शहरी भागातल्या लोकांना पक्की घरं दिली जातील. पण ही घोषणा हवेतच राहिली. मोदी सांगतात गॅरंटी आहे. पण ती काही खरी नाही. त्याचा अनुभव अनेकदा आला आहे”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

  लोकसभेतील घुसखोरी प्रकरणावर भूमिका
  “संसदेत काही लोक घुसले. ते घुसून काहीतरी मागणी करीत होते. नंतर सभागृह बंद झाले. त्यावर आमच्या खासदारांनी पंतप्रधानांनी किंवा गृहमंत्र्यांनी संसदेला यासंदर्भात आढावा माहिती द्यावी. पण त्याला परवानगी दिली गेली नाही. विरोधी पक्षांच्या आग्रही भूमिकेचा परिणाम १४६ खासदारांच्या निलंबनात दिसून आला”, असेही शरद पवारांनी सांगितले.