शरद पवारांकडून शिवसेना संपवण्याचं प्रयत्न; दीपक केसरकर यांचा आरोप

उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. 

    मुंबई : शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला.

    भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीतर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केसरकर बोलत होते. केसरकर म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात अनेक बेताल आरोप केले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असणाऱ्या शिवसैनिकांनी वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

    शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेत फूट पाडली, हे जगजाहीर आहे. २०१४ नंतर ही अनेक घडामोडीत पवार यांनी शिवसेनेसारखी लढाऊ संघटना कशी संपेल, या दृष्टीनेच प्रयत्न केले.