शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक; वंचितच्या युतीबाबत बैठकीत होणार मंथन?, बैठकीला ‘या’ नेत्यांची उपस्थिती

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

  मुंबई- राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक (Meeting) बोलावली आहे. या बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांवर मंथन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ११ वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

  वंचितच्या युतीबाबत चर्चा…

  दरम्यान, काल ठाकरे गटाने म्हणजे उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेत ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा केली आहे. मात्र वंचितला अजून मविआत स्थान देण्यात आलं नाही. वंचितच्या मविआतील समावेशावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळं आजच्या बैठकीत वंचितच्या मविआतील समावेशाबद्दल चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत वंचितबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  पवारांच्या भूमिकेकडे लक्ष…

  दरम्यान, शरद पवारांना पहिल्यापासून विरोध करणार प्रकाश आंबेडकरांनी आता भूमिक बदलली आहे, काँग्रेससह राष्ट्रवादी देखील आम्हाला चालेल असं आंबेडकरांनी म्हटलंय. मात्र वंचितचा घटक पक्ष म्हणून किंवा वंचित मविआत घेण्याबाबत शरद पवारांची यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळं पवार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

  वंचित अद्याप समावेश नाही…

  वंचित बहूजन आघाडी आणि शिवसेनेने युती केली असती तरी वंचितचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमचा विरोध केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमचे पूर्वी चांगले सख्य होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणार नाही, असा विश्वास वाटतो.

  पवार आमच्यासोबत येतील अशी आशा – आंबेडकर

  ही युती बदलाचं राजकारण आणेल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. सामाजिक प्रश्नांना ज्या ज्या वेळी हात घातला जातो, तेव्हा राजकीय गणित बदलतात, असं आंबेडकरांनी सांगितलं. उपेक्षितांचं राजकारण करावं, अशा पद्धतीचं राजकारण सुरु केलं होतं. उमेदवारी देण्याचं सार्वत्रिकीकरण होईल, अशी अपेक्षा होती. राज्यातील घराणेशाहीच्या राजकारणावर त्यांनी टीका केली. काही कुटुंबांमध्ये राजकारण आत्तापर्यंत सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात लुटारु आणि भांडवलशाही असणाऱ्यांची सत्ता असल्याचं सांगितलं आहे. शरद पवार हे आमच्यासोबत येतील, अशी अपेक्षा आंबेडकरांनी व्यक्त केली.