शरद पवार यांचा एल्गार; म्हणाले, ‘चिन्ह गेले तरी अस्तित्व संपत नाही’

बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी पक्ष नावाने उभा करण्याचा निर्धार केला. आपण सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात गेलो आहोत, त्या ठिकाणी योग्य निकाल लागेल असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला. 

    बारामती : बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष नावाने उभा करण्याचा निर्धार केला. ‘पक्ष स्थापन करणाऱ्याचा पक्ष ताब्यात घेतला, यापूर्वी देशात कधी असे झाले नव्हते, मात्र संघटनेचे चिन्ह किंवा पक्ष गेल्यामुळे अस्तित्व संपत नाही, पुन्हा नव्या जोमाने आपण राज्यात संघटना बांधणार असून या माध्यमातून नव्या जोमाने जनतेपर्यंत पोहोचू,’ असा निर्धार ज्येष्ठ नेते शरद पवार  केला. आपण सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात गेलो आहोत, त्या ठिकाणी योग्य निकाल लागेल असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला.

    बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला, त्यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “यापूर्वी देशामध्ये अनेकदा पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्या, ज्याने पक्ष स्थापन केला त्याचाच पक्ष काढून घेणे हे कायद्याला धरून वाटत नाही, त्यामुळेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. त्याचा योग्य निकाल लागेल अशी अपेक्षा आहे.
    चिन्हाची फार चिंता करायची नाही, आजपर्यंत मी १४ वेळा निवडणुका लढलो. त्यापैकी पाच निवडणुकांचे चिन्ह हे बैलजोडी, गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा व घड्याळ अशी होती. मात्र चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचा अस्तित्व संपेल, असे कधी घडत नाही.” असे शरद पवार म्हणाले.

    “सामान्य माणसांशी संपर्क कायम वाढला पाहिजे, त्याला पण नव्याने काय देऊ शकतो यावर विचार केला पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे नव्याने वाटचाल करताना देखील फार अडचणी येणार नाहीत, अशा शब्दांत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नव्या उमेदीने महाराष्ट्रात फिरून लोकांशी संपर्क साधून लोकांना भूमिका पटवून देणार आहोत. महाराष्ट्रातील जनता आपल्या या नव्या भूमिकेचे निश्चित स्वागत करेल,” असा एल्गार शरद पवार यांनी बारामतीमध्ये केला.