चुकीच्या प्रवृत्तींना आवर घालण्यासाठीचं इंडिया आघाडी – शरद पवार

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात आपल्याला महत्वाच्या राजकीय लढाईला सामोरे जायचे आहे.

    अलिबाग : आज देशात चुकीच्या प्रवृत्तींना आवर घालण्याची गरज आहे. त्याकरिता एकत्र येण्याची गरज आहे. तीच भूमिका घेत इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकसंघाचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी आमदार मुश्ताक अंतुले, माजी आमदार रवींद्र वायकर, पंडित पाटील, सुरेश लाड, बाळाराम पाटील आदी राज्यातील इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती.

    यावेळी बोलताना शरद पवार यांनी देशातील चुकीच्या प्रवृत्तींना आवर घालण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगत मोदी सरकारवर टीका केली. कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी रायगड जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सोहळा हा खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले. रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. अनेक मान्यवरांकडून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम झाल्याचे शरद पवार म्हणाले.आपल्या भाषणादरम्यान शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री बॅ अंतुले यांचा विशेष उल्लेख केला. “रायगड जिल्ह्याचा मी एकदा पालकमंत्री होतो. तेव्हा अंतुलेसोबत संपूर्ण जिल्हा फिरलोय. तेव्हा माहीत पडलं की अंतुलें जिल्ह्यातील शेवटच्या माणसाला ओळखत होते. अंतुले देशाच्या हिताचे नेते होते.” असे शरद पवार यावेळी म्हणाले.

    या कार्यक्रमात शरद पवार यांनी केंद्र सरकारचाही शेलक्या शब्दात समाचार घेतला. “आज देशात चुकीच्या प्रवृत्तींना आवर घालण्याची गरज आहे. त्याकरिता एकत्र येण्याची गरज आहे. तीच भूमिका घेत इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकसंघाचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनीही सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. आमच्यात कधीही कुणी सुडाचं राजकारण केलं नाही. आताच्या राजकारणातील चित्र वेगळं आहे. असे म्हणत हुकूमशाहीला गाडण्यासाठी एकत्र आलो आहोत. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. तसेच राजकारणातील गद्दारांना टकमक टोक दाखवण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात आपल्याला महत्वाच्या राजकीय लढाईला सामोरे जायचे आहे. यासाठी आपापसातले मतभेद बाजूला ठेवून सर्वजण मनाने एकत्र आले आहेत. यावेळी त्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कौतुक केले.

    आ जयंत पाटील यांनी बँकेचे नेतृत्व करताना कधीही सूट मागितली नाही. नियमाने आणि शिस्तीने बँक चालवली. म्हणूनच आज देशातील अग्रणी बँक ठरली असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना बँकेचे अध्यक्ष आ जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देणारी पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक असल्याचे सांगितले. श्रीवर्धन इतर कुणाचा बालेकिल्ला नाही तर फक्त अंतुलेंचाच बालेकिल्ला आहे. आम्ही मोठी चूक केली असल्याचे सांगतानाच त्यांनी पवार साहेबांच्या शब्दाबाहेर कधी जायचे नाही, त्यांना कधी नाही बोलायचे असा सल्ला आम्हाला वडिलांनी दिला त्याचे आम्ही पालन केले. त्यांनी पुढे शरद पवार यांना उद्देशून म्हटले की, नको त्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवू नका, आणि आम्हाला अडचणीत आणू नका अशी विनंती देखील यावेळी केली. ही बँक आ जयंत पाटील यांची नाही तर शेतकऱ्यांची आहे. असेही ते म्हणाले. स्वागत माजी आमदार पंडित पाटील, बाळाराम पाटील यांनी केले. सुत्रसंचलन वरिष्ठ व्यवस्थापक संदीप जगे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी केले.