संपूर्ण ताकदीने पक्ष मजबूत करा, शरद पवारांचा शिबिरात पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ला

पूर्ण ताकदीनं पक्ष मजबूत करा, असा सल्ला शरद पवारांनी शिर्डीतील शिबिरात पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.

    शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rashtrawadi Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील (Shirdi) दोन दिवसीय शिबिराला हजेरी लावली. तब्येत बरी नसतानाही सगळ्यांच्या इच्छेचा मान राखण्यासाठी मी शिबिरासाठी आलो असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. पूर्ण ताकदीनं पक्ष मजबूत करा, असा सल्ला शरद पवारांनी यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. शरद पवार हे थेट मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयातून शिबिरात दाखल झाल्यामुळे एक वेगळे वातावरण तयार झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये बारा हत्तींचे बळ संचारल्याचे चित्र निर्माण झाले.

    वैचारिक शक्ती देणारे हे शिबीर आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी गोळा झाली आहे. सगळ्यांना वाटत होतं की मी या शिबिरामध्ये यावं म्हणून मी आलो आहे, असं ते म्हणाले.

    दरम्यान, शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांचे भाषण दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले. मात्र त्यापूर्वी शरद पवार यांनी दोन मिनिटे व्यासपीठावरून बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

    शरद पवार म्हणाले की, राज्यातून आलेल्या प्रत्येक कार्यकर्ता यांचे मी स्वागत करतो. दोन दिवस हे शिबीर चालले, अतिशय उत्तम शिबीर पार पडले. मी अनेक  वक्त्यांची भाषणे ऐकली. मला सविस्तर बोलणं शक्य नाही, कारण मला डॉक्टरांनी दहा ते पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. जास्त बोलू नका असे म्हटले आहे. तरीसुध्दा मी तुमच्यासाठी आज इथे आलो. मला कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे जास्त बोलू शकत नाही. यावेळी वळसे पाटील यांनी पवारांचे भाषण वाचून दाखवले.

    पुढे भाषणात पवार म्हणाले की, राज्यातून प्रकल्प बाहेर जात आहेत, याची सरकारला काळजी नाही. सध्याचे सरकार काय व कुठे आहे ? हे समजत नाही. संकुचित प्रवृत्ती वाढली आहे. राज्यात ओला दुष्काळ आहे. शेतकरी मदत मिळण्याची वाट बघत आहे. पण सरकार कुठे आहे ? असा प्रश्न पडतो.

    आगामी काळात आपला पक्ष वाढवावा लागेल. पुरोगामी विचारांची कास सोडू नका, असं पवार यांनी म्हटलं आहे. निवडणुकीसाठी कामाला लगा. हे शिबीर खूप छान झाले. या शिबिरातून पदाधिकारी व कार्यकर्ते ऊर्जा घेवून जातील व परिवर्तन घडवतील यात मला शंका नाही आहे, असं शेवटी ते म्हणाले.