‘खडसेंना पक्षात घेणे ही चूक झाली’; शरद पवार यांची कबुली

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत घेणे ही आपली सर्वात मोठी चूक असल्याची कबुली राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यातील एका बैठकीत दिली. पक्षांतर्गात राजकारणाला कंटाळून खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर शरद पवार यांनी खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता.

    पुणे : एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत घेणे ही आपली सर्वात मोठी चूक असल्याची कबुली राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यातील एका बैठकीत दिली. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर शरद पवार यांनी खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता. तथापि, आता खडसे पुन्हा भाजपमध्ये जात आहे. हाच मुद्दा बैठकीत उपस्थित झाला असता पवार यांनी कबुली दिली असल्याची माहिती माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली.

    माजी आमदार सतीश पाटील यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. ते म्हणाले, खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला आम्ही विरोध केला होता. त्यांना घेऊन पक्षाचा काहीच फायदा होणार नाही, हे आम्ही शरद पवार यांना सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पुण्यामध्ये जळगावमधील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सदर गोष्ट चर्चेला आली.

    त्याचवेळी मी शरद पवार यांना सांगितले की, खडसेंना पक्षात घेण्यासाठी मी विरोध केला होता. त्यासाठी तुमच्याशी अर्धा तास भांडलो. तरीही तुम्ही माझे म्हणणे न मानता त्यांना पक्षात घेतलं आणि आमदार केलं. त्यावेळी तुम्ही आमचे ऐकलं असतं, तर आज आपल्याला रावेरमध्ये उमेदवार शोधण्यासाठी फिरावं लागलं नसतं. त्यानंतर शरद पवार यांनी माझ्याशी बोलताना ‘खडसे यांना घेऊन चूक झाली’ हे मान्य केल्याचे पाटील म्हणाले.